Nashik News : घुंगरू मुके झाले... लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांच्या निधनाने नाशिकसह कलाविश्व हळहळले

Madhu Kambikar Passes Away: Lavani Queen’s Demise Shocks Nashik
Published on: 
Updated on: 

Madhu Kambikar Passes Away Lavani Queen’s Demise Shocks Nashik

अंजली राऊत

नाशिक : ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक समर्थ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि अस्सल लोककलांच्या सादरीकरणाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या कांबीकर यांच्या कलाप्रवासाच्या अनेक आठवणी नाशिकशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून नाशिकमधील कलाप्रेमींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

‘पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’, ‘फुलवंती’ अशा अनेक नाटकांतून आणि ‘सतीची पुण्याई’, ‘दगा’, ‘लक्ष्मी’, ‘एक होता विदूषक’ सारख्या ७५ हून अधिक चित्रपटांमधून मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या थोर लावणीसम्राज्ञी, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू कलाकार गमावला आहे. लावणीला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या आणि दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करणाऱ्या कांबीकर यांचे योगदान मराठी कलाविश्वात सदैव स्मरणात राहील.

— जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य वितरण व्यवस्थापक संघ

त्यांच्या अदाकारीने रसिकांना वेड लावले' "मधु कांबीकर यांच्या निधनाने मराठी लोककलेतील एक तेजस्वी पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. साधारण १९७५-७६ च्या सुमारास नाशिकच्या खुल्या नाट्यगृहात त्यांचा कार्यक्रम पाहण्याची आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मला मिळाली होती. त्यांच्या अदाकारीने त्या काळात प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. नृत्य, अभिनय आणि सहजसुंदर आविष्कारातून त्यांनी तमाशा कलेला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. कलेप्रती समर्पित आणि सुसंस्कृत अशा या थोर कलावंताचे जाणे मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

— नंदकुमार देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत त्यांची भेट झाली होती. ‘शापित’ या चित्रपटातील स्त्रीपात्राचा संघर्ष त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडत त्या भूमिकेला योग्य न्याय दिला. तात्यासाहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्या काळात आमच्या विजय नाट्य मंडळातर्फे सादर झालेल्या ‘चंद्र जिथे उगवत नाही’ या नाटकात त्यांनी प्रमुख स्त्री व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपट, नाटक, लोकनाट्य अशा विविध कलाप्रांतांतील त्यांचा चतुरस्र अनुभव त्यांच्या अभिनयातून प्रत्ययाला यायचा. तसेच 'एक होता विदूषक' या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.

— श्याम लोंढे, समिती प्रमुख, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, नाशिक शाखा

"मधु कांबीकर यांच्या समकालीन काळात आम्ही रंगमंचावर काम केले आहे. आम्ही वेगवेगळ्या समूहांतून रंगभूमीची सेवा करत होतो; मात्र गणेशोत्सव, नवरात्र अशा सणावारांच्या काळात आमची हमखास भेट होत असे. त्या कलेशी अतिशय प्रामाणिक होत्या. त्या केवळ एक उत्कृष्ट नृत्यांगना नव्हत्या, तर त्यांचा स्वभावही अत्यंत मनमिळाऊ होता."

— बबनराव घोलप, माजी आमदार

"नाशिकमध्ये त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याच्या अनेक आठवणी आहेत. येथे शासनातर्फे आयोजित करण्यात आलेला त्यांचा 'सखी माझी लावणी' हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. त्या सर्वांगसुंदर नृत्यांगना होत्या. 'एक होता विदूषक' चित्रपटातील ना. धो. महानोर यांची 'भरलं आभाळ... पावसाळी पाव्हणं' ही लावणी त्यांच्या नृत्याविष्कारामुळे अजरामर झाली. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे."

— सुनील ढगे, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक

माझे वडील शाहीर होते. त्या काळात कालिदास कलामंदिरात राज्यस्तरीय लोककलावंत मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात मधु कांबीकर उपस्थित होत्या; त्यावेळी त्यांनी लोककलावंतांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्या अत्यंत कसलेल्या कलावंत होत्या. अनेक चित्रपटांतील अविस्मरणीय भूमिकांतून त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक केली.

— श्रीकांत बेणी, अध्यक्ष, वसंत व्याख्यानमाला, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news