नाशिक

Nashik News : सर आली धावून कच गेली वाहून, विसर्जनाची वाट बिकट

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन दिवसांपासून शहरात बरसत असलेल्या धो-धो पावसाने पुन्हा एकदा रस्त्यांची दैना झाली आहे. मधल्या काळात पावसाने उघडीप घेतल्यानंतर महापालिकेने खड्ड्यांची डागडुजी केली होती. मात्र, ही डागडुजी अर्धवट पद्धतीने केल्याचे पावसानेच उघडकीस आणले आहे. डागडुजी करताना खड्ड्यांमध्ये टाकलेली कच वाहून गेल्याने, खड्डे उघडे पडले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाची वाट बिकट होण्याची शक्यता असून, महापालिकेने पुन्हा एकदा खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे. (Nashik News )

यंदा पाऊस समाधानकारक झाला नसला तरी, सुरुवातीच्या रिपरिप पावसानेच महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीची पोलखोल केली. शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यांत हरविल्याने नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जात होता. अशात महापालिकेने रस्ते दुरुस्ती करण्यावर भर दिला. मात्र, ही दुरुस्ती वर वर केली गेल्याचे पावसानेच उघडकीस आणले आहे. खड्ड्यांमध्ये केवळ कच टाकण्यातच धन्यता मानली गेल्याने, ही कच पावसात वाहून गेली आहे. परिणामी खड्डे उघडे पडल्याने, यातून वाट शोधताना नाशिककरांची 'वाट' लागत आहे. दरम्यान, गणेशोत्सव सुरू असल्याने पुढील दिवसांत देखावे बघण्यासाठी नाशिककर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडणार आहेत. तसेच गणरायाच्या विसर्जन मार्गातही खड्डेच खड्डे असल्याने, रस्ते दुरुस्तीची मागणी केली जात आहे.( Nashik News )

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून शहरातील खड्ड्यांचा प्रश्न सातत्याने एेरणीवर येत असून, महापालिका प्रशासन याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. रस्ते दुरुस्ती केवळ कागदोपत्रीच दर्शविली जात असल्याने, पावसाळ्यात नाशिककरांना खड्ड्यांमधून वाट शोधावी लागत आहे. विशेष बाब म्हणजे रस्ते दुरुस्ती तसेच डागडुजीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात हा खर्च कागदोपत्रीच दाखविला जात असल्याने, नाशिककरांना खड्ड्यांमधून केव्हा मुक्ती मिळेल, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

एकमेकांवर ढकलाढकली

शहरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी एमएनजीएल कंपनीकडून शहरभर रस्ते खोदून ठेवले आहेत. त्याव्यतिरिक्त स्मार्ट सिटीकडूनदेखील रस्ते खोदण्यात आले आहेत. अशात रस्ते दुरुस्ती कोण करणार यावरून महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीकडून एकमेकांवर ढकलाढकली केली जात आहे. एमएनजीएल कंपनीने यापूर्वीच रस्ते डागडुजीसाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनामध्ये रस्ते डागडुजीवरून एकमत नसल्याने नाशिककरांना रस्त्यातून वाट शोधावी लागत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT