उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ट्रॅक्टर चोरीला गेल्याने शेतकरी संतप्त ; लिलाव बंद पाडले

गणेश सोनवणे

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
आठ लाखांचा नवाकोरा ट्रॅक्टर घेऊन बाजार समितीत कांदा भरून आणलेला शेतकर्‍याचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याने संतप्त शेतकर्‍यांनी सुमारे एक तास बाजार समितीचे मुख्य गेट बंद करून कांदा लिलाव बंद पाडल्याची घटना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत घडली आहे. दरम्यान, शिवापूर येथून चोरीला गेलेला ट्रॅक्टर मिळाला आहे.

लासलगाव बाजार समितीतीतून ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना सोमवारी (दि. 28) मध्यरात्री घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकर्‍याने बाजार समिती प्रशासनाकडे सकाळी धाव घेतली. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी 10.35 वाजता बाजार आवारात लिलाव बंद पाडले. अखेर दीड तासाने वातावरण निवळल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले.

टाकळी विंचूर येथील शेतकरी सुरेश आबाजी काळे यांनी नवीन जॉनडियर कंपनीचा ट्रॅक्टर व कांद्याची भरलेली ट्रॉली घेऊन सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवारात लावला होता. सकाळी पुन्हा बाजार समितीत आल्यानंतर ट्रॅक्टर दिसून आला नाही. यावर ट्रॅक्टर चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकर्‍याने बाजार समिती प्रशासनाकडे धाव घेतली. बाजार समितीत बसविलेल्या सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता ट्रॅक्टर बाजार समिती आवारात प्रवेश करताना दिसतो. मात्र, बाहेर जाताना दिसत नाही. बाजार समिती आवारातून ट्रॅक्टर चोरीला गेल्याचे समोर आल्यानंतर सकाळी संतप्त शेतकर्‍यांनी 10.30 वाजता शेतमाल लिलाव बंद पाडले. आवाराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच गर्दी केली होती.

यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. जोपर्यंत ट्रॅक्टर सापडत नाही, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली होती. शेतकर्‍याने गेल्या तीन महिन्यांपूर्वी नवा ट्रॅक्टर खरेदी केला असल्याने तो हताश होऊन रडू लागला होता. यावेळी घटनास्थळी बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, संचालक पंढरीनाथ थोरे, सचिव नरेंद्र वाढवणे, माजी पंचायत समिती सभापती शिवा सुराशे, सदस्य उत्तमराव वाघ, निफाड शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, राष्ट्रवादी नेत्यांनी धाव घेतली.

कोटमगाव रोडवर वाहनांचा खोळंबा…
ट्रॅक्टर शोधून द्यावा किंवा न सापडल्यास नवीन ट्रॅक्टर द्यावा, अशी मागणी शेतकर्‍याने बाजार समितीकडे केली. बाजार समितीकडून संबंधित शेतकर्‍याची समजूत काढल्यानंतर दीड तासाने पुन्हा लिलाव पूर्ववत झाले. यावेळी मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने नव्याने कांदा लिलावासाठी येणारे व लिलाव होऊन बाहेर जाणारे ट्रॅक्टर मार्ग बंद झाल्याने अडकून पडले. लासलगाव-कोटमगाव रोडवर दुतर्फा रांगा लागून वाहतूक खोळंबली होती. त्यातच पालकमंत्री छगन भुजबळ यांचा लासलगाव दौरा असल्याने पोलिस यंत्रणेवर ताण पडला. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांसह यंत्रणा दाखल होऊन चोख बंदोबस्त दिला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT