बेळगाव : रस्ता हिंडलग्यात, तक्रार दिल्‍लीकडे, गदारोळ बंगळुरात | पुढारी

बेळगाव : रस्ता हिंडलग्यात, तक्रार दिल्‍लीकडे, गदारोळ बंगळुरात

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याचे मंत्री के. एस. ईश्‍वराप्पा यांच्यावर 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप झाल्यामुळे राज्याबरोबरच बेळगावचे राजकारणही तापू लागले आहे. बेळगावच्या ठेकेदाराने मंत्री ईश्‍वराप्पा यांच्याविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. तर त्याला उत्तर म्हणून मंत्री ईश्‍वराप्पा यांनी ठेकेदाराविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोठावला असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये आता आम आदमी पक्षाने उडी घेतली भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे मंत्री ईश्‍वराप्पा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे.

हिंडलगा गावची लक्ष्मी यात्रा 2021 मध्ये झाली. या यात्रेच्या आधी गावात चार कोटी रूपयांची कामे करण्यात आली. ठेेकेदार संतोष पाटील यांनी ती कामे केली आणि बिलासाठी पाठपुरावा सुरू केला. तथापि, बिल मंजूर करण्यासाठी 40 टक्के कमिशन मागण्यात येत आहे. मला धमकीचे फोन येत आहेत, असे ठेकेदार पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले असल्याचे सांगितले आहे.पंतप्रधान मोदींकडे देण्यात आलेल्या पत्रामुळे राज्यात आणि बेळगावच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

दरम्यान, मंत्री ईश्‍वरप्पा यांनी लाचखोरीचा इन्कार केला आहे. ठेकेदार संतोष पाटील याला आपण ओळखत नाही. जाणीवपूर्वक हे आरोप करण्यात येत आहेत. यामागे काँग्रेसचा हात आहे, असे सांगत मानहानीचा दावा ठोठावला आहे, असे त्यांनी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे. तर ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याच्या मुख्य सचिवांनी ठेकेदार पाटील यांनी सांगितलेल्या कामांना खात्याची अनुमतीच नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना निधी देण्याचा विषयच नाही, असे कळवले आहे.

हिंडलग्यात रस्ता, तक्रार दिल्लीकडे आणि बंगळूरसह राज्यभर खळबळ यामुळे जिल्ह्यात या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये आम आदमी पक्षाने उडी घेतली असून 40 टक्के कमीशनवर सरकार चालत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप झालेले मंत्री ईश्‍वराप्पा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पत्रकार परिषदेव्दारे केली आहे.

ठेकेदार हिंदू वाहिनीचा नेता?

मंत्री के. एस. ईश्‍वराप्पा यांच्यावर 40 टक्के कमीशनचा आरोप करणारे ठेकेदार संतोष पाटील हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या हिंदू वाहिनीचे नेते असल्याचे वृत्त एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या पत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय कार्यवाही करतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button