जयसिंगपूर : दहावीचा विज्ञान पेपर फुटला, सामाजिक कार्यकर्त्यांकडून पर्दाफाश | पुढारी

जयसिंगपूर : दहावीचा विज्ञान पेपर फुटला, सामाजिक कार्यकर्त्यांकडून पर्दाफाश

जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर आज बुधवारी(ता.३०) होणार आहे. दरम्यान हाच पेपर जयसिंगपूरमध्ये फुटल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर जयसिंगपूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पेपर कस्टडी असणाऱ्या शाळेत गोंधळ घातला.

घटनेचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी कस्टडी असणारे शाळेत धाव घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम हाती घेतले आहे.

जयसिंगपूर शहरातील एका शाळेत कस्टडी असून येथून तालुक्यातील शाळांमध्ये पेपर दिले जातात. दहावीच्या पहिल्या पेपरपासूनच पेपर फुटीची चर्चा सुरू होती. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर मंगळवारीच फुटल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

दरम्यान, केवळ पाचशे रुपयांना पेपर विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून यात जबाबदार असणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या या आंदोलनामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही जयसिंगपुरात तळ ठोकला.

दरम्यान, या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून पेपरफुटी प्रकरणी जबाबदार असणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुरज भोसले, अमरदीप कांबळे, ॲड संभाजीराजे नाईक यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Back to top button