उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सुविचार गौरव पुरस्काराचे वितरण ; सिद्दार्थ जाधव, पूजा सावंत, चिन्मय उद्गीर यांचा सन्मान

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; सुविचार मंचतर्फे शनिवारी (दि.5) सुविचार गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव, चिन्मय उद्गीरकर व पूजा सावंत यांना सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हाचे पालकमंत्री छगन भुजबळ, पोलिस आयुक्त दीपक पांडेय, आमदार माणिक कोकाटे व हिरामण खोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दक्षिण भारतामधील राज्यांमध्ये कलेच्या क्षेत्रातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होत असताना महाराष्ट्रातील माणूस आपल्याच माणसाला कमी मोठे करण्यात कमी पडतो, अशी खंत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केली. आजचे युग युवकांचे असून त्यांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, मराठी माणसे ही आपल्या मर्यादेत राहताना प्रेम व द्वेषही व्यक्त हातचे राखून करतात. त्याउलट दक्षिणेकडील राज्यांमधील लोक हे आपल्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करताना कोठेही कमी पडत नाही. आयुष्य हे सकारात्मक जगताना ते निर्मंळ कसे होईल, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, महाराष्ट्राला चांगली सेवा देण्याचे कार्य सांगली जिल्हाच करू शकतो, अशी कोपरखळी त्यांनी यानिमित्ताने लगावली.

सुविचार मंचचे सचिव रवींद्र पगार यांनी प्रास्ताविक केले. आकाश पगार यांनी सूत्रसंचालन केले. मंचचे अध्यक्ष अशोक खुटाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, माजीमंत्री शोभा बच्छाव, कोंडाजी आव्हाड, माजी आमदार दीपिका चव्हाण आदी उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान
सुविचार मंचतर्फे यावेळी नितीन महाजन, प्रा. शं. क. कापडणीस, ईश्वरी सावकार, मधुकर कडलग, किशोर खैरनार, डॉ. अतुल वडगावकर, हेमंत राठी आदी मान्यवरांचा सुविचार गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

भुजबळांची टोलेबाजी
पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी टोलेबाजी केली. यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्यावर निशाणा साधताना गोदावरी नदीत कधीतरी रामकुंडात स्नान करावे. त्यासाठी आयुक्त म्हणून तुमचीदेखील गोदावरी निर्मळ वाहण्यासाठीची जबाबदारी असल्याचा कानपिचक्या भुजबळांनी दिल्या.

जीवनात हरणे स्वीकारावे : सिद्धार्थ
अभिनेता सिद्धार्थ जाधव याने मार्गदर्शन करताना जीवनात कधीकधी हरणेही महत्त्वाचे असते. कारण आपल्याला हरविण्यासाठी समोरच्याला किती मेहनत घ्यावी लागली, हे त्यातून दिसून येते. स्वत:बद्दल न्युनंगड दूर सारत आपल्यामधील क्षमता ओळखून का चांगले देता येईल, याचा विचार करावा. अभिनेते उद्गीरकर यांनी गोदावरीचे प्रदुषण रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज व्यक्त केली. पूजा सावंत यांनी जीवनात आलेल्या अनुभवांची पट यावेळी उलगडून सांगितला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT