उत्तर महाराष्ट्र

नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन

अंजली राऊत

वणी : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील मावडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सुगुणा फूड्स कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरींचे पाणी प्रदूषित होत असून, शेतजमिनीचा पोतही खराब होत आहे. याबाबत कारवाई करावी अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी लेखी तक्रार दत्तात्रेय भवर, नाना भवर, विकास घुले, देवीदास घुले, संजय कावळे, माधव महाले, राहुल पवार, मयूर घुले या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व पोलिस अधीक्षक, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडे केली आहे.

मावडी शिवारातील सुगुणा कंपनीत उत्पादन प्रक्रियेनंतरचे दूषित पाणी परिसरातील विहिरीत व शेतजमिनीत प्रवाहित होत असल्याने शेतकर्‍यांच्या पिकांची हानी होत आहे. विहिरीत रसायनमिश्रित पाणी झिरपत असल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक आहे, याबाबत प्रशासनाला सूचित करूनही कारवाई होत नाही. त्रस्त शेतकर्‍यांनी आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. कंपनी 2006 पासून सुरू असून नियम, अटी व शर्थीच्या पालनाबाबत वाटाण्याच्या अक्षता व्यवस्थापनाने लावल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. मावडी ग्रामपंचायतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करून याबाबत योग्य उपाययोजना करण्याचे आदेश कंपनीला बजावलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा दौर्‍यावेळी पिंपळगाव टोलनाक्यावर शेतकर्‍यांनी निवेदन दिले होते. अतिवृष्टीमुळे कंपनीची संरक्षक भिंत जमीनदोस्त झाल्यानंतर या समस्येत वाढ झाली. कंपनी परिसरातील पाझर तलावात हे कंपनीचे रसायनमिश्रित पाणी मिसळत असून, त्याचा विपरीत परिणाम हा भागातील शेतजमिनीत होत आहे. कंपनी प्रशासन जाणूनबुजून या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकर्‍यांनी लेखी तक्रारीत म्हटलेले आहे. या परिसरातील शेतकरी 2006 पासून सातत्याने पाठपुरावा करीत असून,16 वर्षांत प्रदूषण नियंत्रण महामंडळ, संबंधित विभागाने दखल घेतली नाही, याकडे शेतकर्‍यांनी लक्ष वेधले.

कंपनीचा थंड प्रतिसाद
याबाबत कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीशी दैनिक 'पुढारी'च्या वार्ताहराने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सध्या कंपनीतील कर्मचारी आणि प्रशासनही येथे नसल्याचे समजते.

"मावडी ग्रामपंचायतीने आतापर्यंत अनेकदा सुगुणा फूड्स कंपनीला नोटीस दिली असून, त्यांनी त्याचे काहीच उत्तर दिलेले नाही. शेतात रसायनमिश्रित पाणी जात असल्याने त्रास होत आहे. हे पाणी पाझर तलाव व विहिरीत उतरत असल्याने ते हानिकारक आहे. याबाबत दखल न घेतल्यास कंपनी बंद करण्याबाबत नोटीस बजावण्यात येईल." – आर. जी. दळवी, ग्रामसेवक, मावडी.

सुगुणा फूड्स कंपनीत अंड्यापासून कोंबडीचे पिल्ले तयार केली जातात. त्यातील मेलेली पिल्ले हे मिक्सरमध्ये बारीक करून त्यात काही रसायन टाकून पाण्यात सोडण्यात येते. कंपनीच्या जवळ असलेल्या पाझर तलावात तसेच आजूबाजूच्या विहिरीत ते झिरपते. तक्रार करून शासकीय यंत्रणा दखल घेत नाही. – दत्तात्रेय भवर, शेतकरी, मावडी.

"2006 पासून सातत्याने सुगुणा फूड्स कंपनीतून येणारी दुर्गंधी, दूषित पाण्याने आम्ही आजूबाजूचे शेतकरी ग्रासलो आहोत. प्रशासकीय यंत्रणा दखल घेत नसल्याने आम्ही हताश झालेलो आहोत. आमच्या शेतात रसायनयुक्त पाणी येत असल्याने पिकांवर परिणाम झाला आहे." – विकास घुले, शेतकरी.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT