अकार्यक्षम संस्था निघणार अवसायनात | पुढारी

अकार्यक्षम संस्था निघणार अवसायनात

कराड : अशोक मोहने सहकार विभागाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवून अनेक सहकारी संस्थांचे कामकाज सुरू आहे. काही संस्था केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे समोर आले असून या संस्था अवसायनात काढण्याच्या हालचाली सहकार आयुक्तांनी सुरू केल्या आहेत. याबाबत निबंधक कार्यालयाकडून नोंदणीकृत सहकारी संस्थाचे जिल्हा व तालुका निहाय सर्वेक्षण करण्यात येणार असून 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंंबर या कलावधीत हे सर्वेक्षण होणार आहे. यामध्ये बँका, पतसंस्था, पाणीपुरवठा संस्था, सोवा सोसायट्या, औद्योगिक सोसायट्या, पाणीपुरवठा संस्था, मजूर संस्था, दूध संस्था यांचा समावेश असून या सर्वेक्षणातून गृहनिर्माण सोसायट्या वगळण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शासन सहकार, पणन विभागाच्या सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. राज्यात एकूण 1 लाख 98 हजार 786 संस्था नोंदणीकृत आहेत. या नोंदणीकृत संस्थांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि त्या खालील उपविधीतील तरतुदीनुसार कामकाज करणे अपेक्षित आहे. परंतु काही सहकारी संस्था सदर अधिनियम, नियम व उपविधीनुसार कामकाज करत नसल्याने निदर्शनास आले आहे.

सहकारी संस्थेची ज्या उद्देशाने नोंदणी करण्यात आली आहे त्या उद्देशाला संस्थाचालकांकडून हरताल फासला गेला आहे. नियम धाब्यावर बसवून कामकाज होत आहे. काही नोंदणीकृत संस्थांनी आपले कामकाज पूर्ण थांबविले असल्याने अशा संस्थांचे अस्तित्व केवळ कागदोपत्री राहिले आहे. अनेक संस्था सहकार कायद्याच्या तरतुदी नुसार आपले वैधानिक लेखापरिक्षण पूर्ण करून घेत नसल्याचेही दिसून येत आहे. काही संस्था त्यांनी दिलेल्या पत्यावर दिसून येत नसून त्यामुळे त्यांचे दप्‍तरही लेखापरिक्षणासाठी उपलब्ध होत नाही या बाबीही समोर आल्या आहेत.

केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्थांची नोंदणी नव्या तरतुदी नुसार रद्द करण्यात येणार आहे. सहकार चळवळ निकोप व सदृढ वाढीसाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे निबंधक कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान उपनिबंधक, सहाय्यक निबंधक त्यांच्या अधिकार कक्षेतील सर्व संस्थांचा (गृहनिर्माण संस्था वगळूण) सर्वेक्षण कार्यक्रम 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहिमेव्दारे राबविणार आहेत. जिल्हा निबंधक व जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांच्या नियंत्रणाखाली हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

कराड तालुक्यातील 556 संस्थांचा होणार सर्वे..

कराड तालुक्यात बँका, पतसंस्था, सोसायट्या व गृहनिर्माण सासायट्या अशा 675 सहकारी संस्था आहेत. यामध्ये 119 गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या 119 वगळून उर्वरीत 556 सहकारी संस्थांचा सर्वे करण्यात येणार आहे, अशी माहिती उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली. सातारा जिल्ह्यात एकूण 4241सहकारी संस्था आहेत. यामध्ये 1122 या सहकारी हौसिंग सोसायट्या आहेत. त्या वगळून उर्वरीत संस्थांचा सर्वे होणार आहे.

सातारा जिल्ह्यात 4241सहकारी संस्था आहेत. यामध्ये 1122 या सहकारी हौसिंग सोसायट्या आहेत. हौसिंग सोसायट्या वगळून उर्वरती सर्व सहकारी संस्थांचा सर्वे करण्यात येणार असून अकार्यक्षम संस्था बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
– मनोहर माळी
जिल्हा निबंधक सहकारी संस्था

Back to top button