नरेंद्र पाटील यांच्या निषेधार्थ नाभिक समाजाचा मोर्चा | पुढारी

नरेंद्र पाटील यांच्या निषेधार्थ नाभिक समाजाचा मोर्चा

पाटण: पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी मल्हारपेठ, ता. पाटण येथील आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेत नाभिक समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पाटण तालुका नाभिक संघटनेच्यावीने बुधवार दि. 3 रोजी आपली दुकाने बंद ठेवून पाटण पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. नरेंद्र पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्रभर नाभिक समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड व जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी पाटणचे पोलिस निरीक्षक नितीन चौखंडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

केरापुलानजीक नरेंद्र पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेनिमित्त पाटण मतदारसंघात मल्हारपेठ येथे मंगळवारी जाहीर सभा झाली. या सभेमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी नाभिक समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद बुधवारी पाटणसह परिसरात उमटले.

शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी…

नरेंद्र पाटील यांचे भाषण सुरू असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल कदम यांनी नरेंद्र पाटील यांना का थांबविले नाही? याबाबत जिल्हाध्यक्ष हर्षद कदम व शिवसेना यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा शिवसेनेच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नाभिक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला आहे.

Back to top button