उत्तर महाराष्ट्र

नाशिक : हेल्मेट सक्तीत पहिल्या दिवशी ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाइकनवरे यांनी शहरात हेल्मेट सक्ती मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यात गुरुवारपासून ठराविक मार्गांवर ही कारवाई राबवली जात आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.१) पहिल्या दिवशी शहरातील पाच मार्गांवर राबवलेल्या कारवाईत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या चालकांना दोन लाख ७७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अनेकांनी पोलिसांचा ताफा पाहून पर्यायी मार्गावरून जाण्यास प्राधान्य दिले तर काहींना पोलिसांचा अंदाज न आल्याने दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शहरात चालू वर्षात अपघातांमध्ये विना हेल्मेट ८३ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी विनाहेल्मेट व वाहतूक नियम न पाळल्याने शंभरहून अधिक नागरिकांचा अपघाती मृत्यू होत असतो. हे प्रमाण कमी करण्यासाठी न्यायालयानेही दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती केली आहे. मात्र हेल्मेट सक्तीबाबत असलेल्या कारवाई किंवा मोहिमेत सातत्य नसल्याने चालकांमध्येही हेल्मेट वापराबाबत जनजागृती होत नसल्याचे दिसते. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत अजूनही उदासिनता पहावयास मिळते. दरम्यान, पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी एक डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती मोहिम तीव्र करण्याच्या सुचना दिल्यानंतर पहिल्या दिवशी शहरातील आठ ठिकाणी हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या 'नाशिक शहर पोलिस' या ट्विटर खात्यावरून बुधवारी रात्री कारवाईची पुर्वकल्पना देण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी दहा ते बारापर्यंत आठ ठिकाणी मोहिम राबवून कारवाई केली. त्यात पोलिसांचा ताफा पाहून अनेकांनी मार्ग बदलून पळ काढला. तर काहींना पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला. अनेकांनी विविध कारणे देत कारवाईतून सुट देण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी ई चलन पद्धतीने कारवाई केली. त्यामुळे हेल्मेट घातले असते तर वेळ व पैसे दोन्हींची बचत झाली असती असाच काहीसा सुर कारवाई झालेल्या चालकांमध्ये उमटत होता. या कारवाईत नोकरदार वर्गापेक्षा विद्यार्थी, व्यावसायिक चालक अधिक प्रमाणात आढळून आले.

या ठिकाणी झाली कारवाई

शहरातील अशोक स्तंभ, एबीबी सर्कल, स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट, गरवारे पाँइट, पाथर्डी फाटा, बिटको चौक व बिटको महाविद्यालयासमोर सकाळी १० ते १२ व सायंकाळी पाच ते सात या वेळेत कारवाई करण्यात आली. त्यात ई चलन पद्धतीने कारवाई केली. अनेकांनी कारवाई टाळण्यासाठी पर्यायी मार्गांवरून पळ काढला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT