पुणे : पावणेपाचशे महिलांना कर्करोग | पुढारी

पुणे : पावणेपाचशे महिलांना कर्करोग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे 484 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. ’माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अभियानात याचे निदान झाले आहे. या महिलांमध्ये अशा कर्करोगाची लक्षणे होती. त्यांचे अधिकचे निदान आणखी चाचण्या केल्यानंतर स्पष्ट होणार असले तरी प्राथमिक पातळीवर या लक्षणांचे निदान झाले आहे.

या अभियानामुळे ही माहिती पुढे येऊ शकल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तर हा कर्करोगच असल्याचे निदान करण्यासाठी त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सध्या ’माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविले जात आहे.

याबाबत अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ म्हणाले, ’स्तनाचा कर्करोग कोणत्याही गटातील, कोणत्याही भागातील महिलांना होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत सजग राहायला हवे. या अभियानात सापडलेल्या संशयित रुग्णांबाबत पुढील निदानासाठी आणखी चाचण्या करण्यात येणार आहेत. निदान झाल्यावर त्यांना अन्य मोठ्या रुग्णालयांत उपचार दिले जातील. त्यासाठी त्यांच्या पात्रतेनुसार विविध योजनांचा लाभ दिला जाईल.

Back to top button