पुणे : लिंगाणा शिखर सर करून संविधान दिवस साजरा शिलेदार | पुढारी

पुणे : लिंगाणा शिखर सर करून संविधान दिवस साजरा शिलेदार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिलेदार अ‍ॅडव्हेंचरच्या माध्यमातून आणि राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने किल्ले लिंगाण्याचे शिखर सर करून ही मोहीम भारतीय संविधानाला समर्पित करण्यात आली. समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीच्या किल्ले लिंगाणावरील सुळक्यावर चढाई करत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला.

भारतीय संविधानाला समर्पित या मोहिमेसाठी शिलेदार अ‍ॅडव्हेंचरचे सर्वेसर्वा, रायगडावरील वाघ दरवाज्यातून सर्वप्रथम यशस्वीपणे रायगड उतरणारे व 16 मिनिटांमध्ये लिंगाणा सुळका सर करण्याचा विक्रम करणारे गिर्यारोहक सागर विजय नलवडे, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास वडघुले, सुनील पाटील व सह्याद्रीचे इतर 12 शिलेदार या मोहिमेत सहभागी झाले होते. लिंगाणा शिखर सर केल्यानंतर सागर नलवडे यांनी लिंगाणा शिखरांची माहिती सांगितली व कैलास वडघुले यांनी संविधानाची

माहिती सांगून भारतीय तिरंगा व भारतीय संविधानाला वंदन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिवस साजरा केला.
शिवतीर्थ किल्ले रायगडावर गेल्यानंतर आजूबाजूच्या सह्याद्रीवर नजर टाकल्यास समोर दिसणारा व आकाशाला गवसणी घालणारा किल्ले लिंगाणाचा उंचच उंच सुळका खुणावत असतो. सह्याद्रीतील आव्हानात्मक व अत्यंत अवघड श्रेणीतील लिंगाणा सुळका सर करण्याचे स्वप्न अनेकांनी बघिलेले असते ते संविधान दिनाच्या निमित्ताने पूर्ण झाले. लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.

बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका असल्याचे वडघुले यांनी यावेळी सांगितले. पुणे जिल्ह्यातील वेल्ह्यापासून जवळ असलेल्या मोहरी (सिंगापूर) नावाच्या सह्याद्रीमाथ्यावरील गावापासून ट्रेकला सुरुवात करावी लागते. या गावापासून बोराट्याची नाळ (दोन डोंगरांमधील अरुंद वाट) जवळ आहे. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे.

लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ 3-4 तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर वेगळाच आनंद मिळतो. अवघ्या 16 मिनीटांमधे दोरचा वापर न करता लिंगाना सुळक्यावर चढाई करण्याचा विक्रम शिलेदार सागर नलावडे यांनी केला आहे.

Back to top button