कोल्हापूर : पोलिसांसाठी आता ‘फुकट’ची केएमटी बंद | पुढारी

कोल्हापूर : पोलिसांसाठी आता ‘फुकट’ची केएमटी बंद

कोल्हापूर, सतीश सरीकर : कुठल्याही रस्त्यावरून केएमटी धावू दे, पोलिसांनी हात केला की बस थांबलीच म्हणून समजायचे. पोलिसांना केएमटीतून प्रवासासाठी ना तिकीट ना थांबण्यासाठी बसस्टॉप. गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोल्हापूर शहर आणि परिसरातील हे चित्र; परंतु आता ते बदलणार आहे. पोलिसांना ‘फुकट’ची केएमटी बंद होणार आहे. महापालिकेने जिल्हा पोलिस दलाला त्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांना केएमटीतून विनातिकीट प्रवास करता येणार नाही.

राज्य शासनाने सार्वजनिक वाहतूक सेवेतून पोलिसांना मोफत प्रवासाचा निर्णय रद्द केला आहे. त्याऐवजी पोलिसांना वेतनातून वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांना यापुढे केएमटीतून तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. परिणामी केएमटीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने 4 मार्च 1991 रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार राज्यातील सर्व शहरांतील पोलिसांना महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक सेवेतून विनातिकीट प्रवास करता येत होते. कोल्हापूर महापालिकेच्या केएमटी बसमधून पोलिसांना मोफत प्रवास दिला जात होता. पोलिसांना वाहतूक भत्ता नसल्याने विनातिकीट प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मंजूर आस्थापनाच्या एक तृतीयांश पोलिस कर्मचार्‍यांची संख्या गृहीत धरून बिलापोटी रक्कम दरवर्षी दिली जात होती. राज्याच्या गृह विभागाकडून मंजूर होऊन आल्यानंतरच जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ती रक्कम वर्ग होत होती.

काळानुसार सर्वच शहरांच्या वाहतुकीत बदल झाला आहे. अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी कर्तव्यासाठी जाताना स्वतःच्या वाहनानेच प्रवास करतात. तसेच बसव्यतिरिक्त इतरही सार्वजनिक वाहनांचा वापर केला जातो. परिणामी पोलिसांना वेतनातूनच वाहतूक भत्ता देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात गृह विभागाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी काढलेला आदेश कोल्हापूर महापालिकेला आला आहे. त्याच्या आधारे महापालिका प्रशासनाने कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाला पत्र पाठवून, यापुढे पोलिसांना केएमटीतून प्रवास करताना विनातिकीट प्रवास करता येणार नसल्याचे कळविले आहे.

राज्य शासनाने महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक सेवेतून पोलिसांना विनातिकीट प्रवास करण्याचा निर्णय रद्द केला असला तरी त्याचा फटका महिला पोलिस कर्मचार्‍यांना बसणार आहे. अद्यापही अनेक महिला पोलिस प्रवासासाठी केएमटीचाच वापर करतात. वाहतुकीसाठी अनेक पोलिस कर्मचार्‍यांना केएमटीचा आधार आहे. सकाळी सहापासून रात्री साडेदहापर्यंत कोल्हापूर शहर परिसरातील ग्रामीण भागात महिला पोलिसांना कुठेही विनातिकीट प्रवासाची सवलत होती. आताही ती मुभा असणार आहे; पण तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे.

पोलिस प्रवासाचे 1 कोटी 55 लाख थकीत…

कोल्हापूर शहर आणि परिसरात 22 मार्गांवर केएमटी धावते. सुमारे 20 किलोमीटर परिसरातील पोलिस कर्मचारी केएमटीतून प्रवास करत होते. त्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने दरवर्षी केएमटीला 70 ते 75 लाख रुपये दिले जातात. सद्यःस्थितीत 2019-20 व 2021-22 या दोन वर्षातील सुमारे 1 कोटी 55 लाख रुपये जिल्हा पोलिस दलाकडे केएमटीची थकबाकी आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने जिल्हा पोलिस दलाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाकडून आदेश आले आहेत. कोल्हापूर महापालिकेसह इतर महापालिकांना कर्तव्यार्थ विनातिकीट प्रवास करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रवास खर्चापोटी त्या परिवहन उपक्रमास शासन निर्णय 4 मार्च 1991 अन्वये अनुदान उपलब्ध करून देण्यात येत होते. 21 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयाद्वारे ते अनुदान रद्द करण्यात आले आहे. त्याच्या आधारे कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाला पत्र पाठवून कळविले आहे.
– टिना गवळी,
अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक,
कोल्हापूर महानगरपालिका

Back to top button