उत्तर महाराष्ट्र

नाशिक महापालिकेची आरक्षणविरहित प्रभागरचना जाहीर होण्याची शक्यता

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचा आरक्षणविरहित प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याने त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेची प्रभागरचना सोमवारी (दि.31) जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास मुंबई महापालिकेप्रमाणेच 1 फेब्रुवारीपासूनच त्याची अंमलबजावणी होऊ शकते.

नाशिक महापालिकेने गेल्या 6 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागरचनेचा सुधारित कच्चा आराखडा सादर केला होता. त्यानंतरही निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचना जाहीर केली नाही. ओबीसी आरक्षणामुळे अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासन आणि निवडणूक आयोगाकडून 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली जात होती. परंतु, प्रारूप प्रभागरचनेला उशीर होत असल्याने निवडणूक आयोगाने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. मनपाने गेल्या 18 जानेवारीला नाशिक शहराची प्रवर्गानिहाय लोकसंख्या व इतर माहिती निवडणूक आयोगाला सादर केली होती. मात्र, ओबीसी आरक्षणाबाबत 8 फेब्रुवारीला निर्णय होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आल्याने प्रभागरचना लांबणीवर पडली होती. परंतु, शुक्रवारी (दि.28) राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर करून हरकती व सूचनांचा कार्यक्रम जाहीर केल्याने याच धर्तीवर नाशिक महापालिकेचाही कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

1 फेब्रुवारीला प्रारूप प्रभागरचना जाहीर होऊन पुढील 15 दिवस हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर हरकती, सूचनांवर सुनावणी होऊन फेब—ुवारीअखेर प्रभागरचना अंतिम होऊ शकते. मतदारयाद्यांची प्रक्रिया याच कालावधीत पूर्ण होईल. एकूणच एप्रिल महिन्याच्या अखेरीस महापालिकेची निवडणूक लागू शकते.

विभागीय कार्यालयात प्रभागरचनेच्या प्रती
प्रारूप प्रभागरचनेचा जाहीर कार्यक्रम कोरोनामुळे नाशिक महापालिका मुख्यालयातील तिसर्‍या मजल्यावरील सभागृहात होऊ शकतो. तसेच प्रभागरचना पाहण्यासाठी त्याच्या प्रती सहाही विभागीय कार्यालयांत उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. त्यादृष्टीने नियोजन करण्याबाबत मनपा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT