उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी महापालिकेने १ एप्रिलपासून सवलत योजना सुरू केली असून, त्यानुसार थकबाकीदारांना चालू एप्रिल महिन्यात तब्बल १० टक्के सवलत दिली जाणार आहे. ऑफलाइन कर भरल्यास आठ टक्के तर ऑनलाइन भरल्यास १० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त मेमध्ये ५ तर जूनमध्ये ३ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही सवलत थकबाकीच्या रकमेवर लागू होणार नाही.

थकबाकी वसुल करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. पंधराव्या वित्त आयोगानुसार नाशिक महापालिकेला पंचवीस टक्के उत्पन्नवाढीच्या अटीवर अनुदान देण्याची तंबी केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर पालिकेने घरपट्टी वसुलीसाठी करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कर सवलतीत वाढ केली आहे. त्यानुसार कर भरण्यासाठी चालू महिन्यात १० टक्के सवलत मिळणार आहे. महापालिकेच्या घरपट्टी आकारणी वर्षातून दोनदा अर्थातच एक एप्रिल याप्रमाणे सहामाही पद्धतीने होते. चालू वर्षी पाणीपट्टीची जवळपास ३० कोटींची तूट येण्याचा अंदाज आहे. पालिकेच्या इतिहासात यापूर्वी कधीही पाणीपट्टी आगाऊ भरल्यास सवलत दिली जात नव्हती, मात्र यंदा पाणीपट्टीसाठी देखील सवलत योजना लागू झाली असून एकरकमी वार्षिक कर भरल्यास एक टक्का किंवा जास्तीत जास्त पाचशे रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

एसएमएसद्वारे बिल

गेल्यावर्षी प्रभाग रचनेचे काम असल्याने नागरिकांना वेळेत पाणीपट्टीचे बिल देता आले नाही. यंदा मात्र, एसएमएस तसेच व्हॉट्स ॲपद्वारे बिले पाठविली जाणार असल्याने पाणीपट्टी वसुलीला वेग येण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु बऱ्याच ग्राहकांचे मोबाइल क्रमांक नसल्याने प्रशासनाला अडचणी येत असल्याचेही समजते आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT