उत्तर महाराष्ट्र

नाशिक : संचालकांची पळवापळवी की, ईश्वर चिठ्ठीचा कौल?

अंजली राऊत

सिन्नर : संदीप भोर

गोंदेश्वराच्या सानिध्यात

सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे या दोन्ही गटांना 18 पैकी नऊ-नऊ अशा समसमान जागा मिळाल्याने सामना 'टाय' झाला आहे. त्यामुळे सभापती, उपसभापतिपदाच्या उत्कंठावर्धक सामान्याकडे लक्ष लागले आहे.

बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक चुरसपूर्ण होणार हे आधीपासून दिसत होते. कोकाटे यांच्या हाती असलेली सत्ता खेचण्यासाठी वाजे-सांगळे गटाने 'फिल्डिंग टाइट' केली होती. आमदार कोकाटेही कच्चे खेळाडू नव्हते, पण माजी सभापती अरुण वाघ, नामदेव शिंदे, भारत कोकाटे यांच्या जोडीला अंतिम टप्प्यात कोकाटे गटातून बाहेर पडलेल्या बाळासाहेब वाघ यांनी वाजे-सांगळे गटाला निर्णायक बळ दिल्याचे निकालातून दिसून आले. त्यामुळे दोन्ही गटांना नऊ-नऊ अशा समसमान जागा मिळाल्या. तथापि, आता सभापती व उपसभापतीपदाची गुरुवारी (दि.18) निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. संचालकांच्या पळवापळवीचा प्रयत्न होणार यात शंका नाही. मात्र, एकमेकांच्या हाताला काहीच लागले नाही तर ईश्वर चिठ्ठीचा कौल घ्यावा लागेल. आणि त्यात नशीबाची साथ कुणाला लाभते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निकालानंतर कोकाटे गटाने आपल्या संचालकांना एकत्र करीत सहलीला पाठविले होते. मात्र सभातिपदाचा निवडणूक कार्यक्रम कधी लागणार, याबाबत अनिश्चितता असल्याने देवदर्शन करून संचालक परतले. वाजे-सांगळे गटाने संचालकांना अज्ञातस्थळी रवाना केले नसले तरी सर्वांवर लक्ष ठेवलेले होते. अशातच सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि त्याच रात्री वाजे-सांगळे गटाने खबरदारी घेत संचालकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.

सभापतिपदाच्या शर्यतीत डॉ. रवींद्र पवार, शशिकांत गाडे यांची नावे चर्चेत
आमदार कोकाटे यांच्या गटातून द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शशिकांत गाडे, तर वाजे-सांगळे गटातून सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार यांची नावे सभापतिपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. उपसभापतिपदासाठीही दोहोंकडून नावे निश्चित आहेत. मात्र, तोडफोड झाल्यास राजकीय वाटाघाटी होऊ शकतात, असे सध्याचे चित्र आहे.

'त्या' संचालकाने वाढवली धाकधूक
या निवडणुकीत तोडफोडीचे राजकारण होणार ही शक्यता असली तरी दोन्ही गटांकडून 'आमच्यात फुटण्यासारखा कोणीच नाही' असे छातीठोकपणे सांगितले जात होते. त्यामुळे दोन्ही गटांनी आरंभी ढिल दिली असली तरी संचालकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती, अशी चर्चा आहे. राजकारणात कार्यकर्त्यांना महत्त्वाकांक्षा असते. काही कार्यकर्ते महत्त्वाकांक्षेपायी तर बर्‍याचदा प्रलोभनाला बळी पडून वेडेवाकडे निर्णय घेतात. आता आमदार कोकाटे गटाचा एक संचालक सध्या 'नॉट रिचेबल' असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. परिणामी कोकाटे गटाची धाकधूक वाढली आहे. येत्या दोन दिवसांत नेमक्या काय काय घडामोडी घडतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT