दापोडीतील नाल्यांमध्ये राडारोड्याचे साम्राज्य | पुढारी

दापोडीतील नाल्यांमध्ये राडारोड्याचे साम्राज्य

दापोडी : पिंपळे गुरव ते दापोडीतील शितळादेवी चौक या रस्त्यावर व दापोडीतील सिध्दार्थनगर येथील नाल्यांमध्ये कचरा व राडाराड्याचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे पावसाळ्यात घरामध्ये पाणी घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नालेसफाईकडे दुर्लक्ष

महापालिकेकडून सांडपाणी व पावसाळी पाणी वाहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून नाल्यांची निर्मिती केली आहे. मात्र, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसरातील अद्याप नालेसफाई होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास नाले तुंबून पाणी थेट रस्त्यावर किंवा घरात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाल्यांमध्ये प्लास्टिक बॉटल, पिशव्या, झाडे-झुडपे व इतर कचर्‍याचे ढीग साचले आहेत.

ये-जा करणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा सामना

कासारवाडी येथील उड्डाण पुलाखाली दोन नाले आहेत. हे दोन्हीही नाले कचर्याने भरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सापांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा साप या नाल्यांमध्ये फिरताना दिसून येतात. यामुळे येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करणे गरजेचे आहे. येणार्या अडचणी डोळ्यांसमोर दिसूनही संबंधित प्रशासनाकडू दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, अद्यापही स्वच्छता करण्यात आलेली नाही. संबंधित आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महापालिकेकडून वर्षभर प्रत्येक विभागाचे नियोजन केले जाते. मात्र, नियोजन करुनही काम वेळेत पूर्ण होत नाही. प्रशासनाच्या अडचणींमुळे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी केली जाते. यामधून कामाचा ही खोळंबा व सोयीसुविधाचाही खोळंबा अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
                                              – दीपाली कणसे, दापोडी

महापालिकेकडून प्रत्येक विभागासाठी नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, केवळ नियोजनाअभावी कामे वेळेवर होत नाहीत. संबंधित दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर आयुक्तांकडून कारवाई करणे गरजेचे आहे. अधिकार्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये.

                                                  – राजू सावळे, शहर उपाध्यक्ष मनसे

Back to top button