उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अशोकनगरला मद्यपींचा हॉटेलवर हल्ला; सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल-खुर्च्यांची मोडतोड

गणेश सोनवणे

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा

अशोकनगर येथील श्रीकृष्णा चायनीज या हाॅटेलमध्ये चायनीज खाण्यासाठी आलेल्या सात मद्यपी टवाळखोरांनी किरकोळ कारणावरून सीसीटीव्ही कॅमेरा तोडून टेबल-खुर्च्यांची मोडतोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रविवारी (दि. 4) रात्री ही घटना घडली. टवाळखोरांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व कॅश काउंटर उलटे करून ड्राॅवरमधील गल्ल्यातून रोकड अकरा हजार रुपये घेऊन पलायन केले.

रविवारी रात्री ८ ला बाहेरून दारू पिऊन आलेल्या सात टवाळखोरांनी खाण्याची ऑर्डर दिली. ते आपापसात मोठमोठ्याने आवाज करून इतर ग्राहकांना त्रास होईल, असे वर्तन करत होते. मालकाने त्यांना आवाज करू नका. इथे आलेल्या फॅमिली व इतर ग्राहकांना त्रास होतो, असे सांगताच टवाळखोरांनी आरडाओरड करून हुल्लडबाजी व गोंधळ घालत तोडफोड सुरू केली. या तोडफोडीत हाॅटेलचे मोठे नुकसान झाले. हल्ल्याची खबर 112 या पोलिस हेल्पलाइनवर देताच पोलिस घटनास्थळी आले. पण तोपर्यंत हल्लेखोर पसार झाल्याने सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हल्लाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलिसांना फुटेज दिले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध हॉटेल मालकास सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता टवाळखोरांची संख्या सात असताना ठाणे अंमलदाराने गांभीर्याने न घेता केवळ तीन-चार जणांनी गोंधळ घातला इतके जुजबी शब्द टाकून जे काही घडले ते अशोकनगर पोलिस चौकीतील हवालदाराला जवाब नोंदविताना सांगा, असे सांगून तक्रारदाराची बोळवण केल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच घटना घडून 48 तास झाले तरी पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

पोलिसांना आव्हान देणारे सातपैकी तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वीही त्यांनी सातपूर परिसरात दमबाजी करून दहशत निर्माण करणे, हाॅटेलमध्ये कुरापती काढून दहशत माजवून बिल न देणे, फुकटात खाणे असे प्रकार केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर पोलिसांचा अंकुश नसल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचाही आरोप होत आहे. तक्रार दाखल करताना गांभीर्याने ऐकून न घेता अतिशय किरकोळ घटना समजून बोळवण करतात. त्यांच्या सोईनुसार वागण्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT