समुद्राच्या पोटात लपलंय अनेक टन बुडालेले सोने! | पुढारी

समुद्राच्या पोटात लपलंय अनेक टन बुडालेले सोने!

न्यूयॉर्क : समुद्राला आपल्याकडे ‘रत्नाकर’ असे म्हटले जाते. अनेक प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती, मोती, मासे यांनी समुद्र संपन्न असतात. मात्र, समुद्रांमध्ये खरोखरचे सोनेही लपलेले आहे व ते अर्थातच जुन्या काळापासून समुद्रात बुडालेल्या जहाजांवरील आहे. अमेरिकन सरकारी विभाग ‘नॅशनल ओशन सर्व्हिस’च्या म्हणण्यानुसार, समुद्राच्या तळामध्ये 20 दशलक्ष टनपेक्षा जास्त सोने पडून आहे. त्याची किंमत सुमारे 800 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. हे सोनं इतकं आहे की त्यातून अमेरिकेसारखे अनेक बलाढ्य देश तयार होतील.

1641 मध्ये ब्रिटनचे रॉयल मर्चंट नावाचे जहाज खराब हवामानामुळे कॉर्नवॉलजवळ पाण्यात बुडाले. या जहाजाचा वरचा भाग 2019 मध्ये सापडला होता. परंतु, त्याचा उर्वरित भाग आजवर सापडलेला नाही. हे जहाज बुडाले तेव्हा त्याच्या तिजोरीत एक लाख पौंड सोनं होतं, असा अंदाज आहे. पोर्तुगीज कार्गो फ्लोअर दे ला मेरने गुलाम देशांमधून सोने आणि मौल्यवान वस्तू गोळा करून पोर्तुगालला नेण्याचे काम जवळजवळ एक दशकापर्यंत केले.

16 व्या शतकाच्या सुरुवातीला पॅसिफिक महासागरात अपघात होऊन एक जहाज समुद्रात बुडाले होते. असा अंदाज आहे की त्यावेळी या जहाजात 2 अब्ज डॉलर्स किमतीचे सोने ठेवण्यात आले होते. अशी एक दोन नाही तर हजारो जहाजं समुद्राच्या तळाशी असतील. नॅशनल ओशनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशननुसार, समुद्रात किती सोने किंवा मौल्यवान वस्तू आहेत हे सांगणे कठीण आहे. बहुतेकदा ते मोठ्या बुडलेल्या जहाजांच्या आधारे मोजले जाते. पण असे मानले जाते की हे सोनं इतकं जास्त असेल की त्याच्या किमतीत अनेक नवे आणि शक्तिशाली देश तयार होऊ शकतात.

Back to top button