गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून धर्मांतर; अल्पवयीन मुले टार्गेट | पुढारी

गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून धर्मांतर; अल्पवयीन मुले टार्गेट

लखनौ; वृत्तसंस्था : ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना धर्मांतर करायला लावणारे एक रॅकेट उत्तर प्रदेश पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ठाण्याच्या एका मास्टरमाईंडच्या मागावर पोलिस आहेत. त्याला लवकरच अटक करू, असे लखनौ पोलिसांनी म्हटले आहे.

या पद्धतीने हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म पत्करायला लावण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यात गाझियाबाद येथील दोन आणि फरिदाबाद व चंदीगड येथील प्रत्येकी एक अशा चार अल्पवयीन मुलांची माहिती हाती लागली असून, त्यांचे धर्मांतर करण्यात आले आहे. गाझियाबादचे पोलिस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी या सार्‍या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली.

कसे चालायचे रॅकेट

फोर्टनाईट या गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून सावज शोधले जाते. गेम खेळणार्‍या अल्पवयीन मुलांना हेरण्यासाठी काही जण या अ‍ॅपवर पडीक असत. तेथे हरणार्‍या मुलांना हे आपली शिकार बनवत. अ‍ॅपचाच चॅट प्लॅटफॉर्म असलेल्या डिस्कॉर्डवर मग शहानवाज ऊर्फ बड्डू यांना मेसेज पाठवून गप्पा मारायचा. तुम्हाला जिंकायचे असेल तर हे वाचा, असे म्हणून त्यांना कुराणातील काही मजकूर पाठवायचा. या मजकुराच्या अर्थावर डोळे बंद करून विचार करा, असे आवाहन करून आता पुन्हा खेळायला सांगायचा. त्यात ही मुले जिंकली, तर तुमच्या श्रद्धेमुळेच तुम्ही जिंकला, असे सांगत त्यांना प्रोत्साहित करायचा.

झाकीर नाईक ते पाकिस्तानी व्हिडीओ

शहानवाज या मुलांच्या कायम संपर्कात राहायचा व त्यांना हळूहळू झाकीर नाईकचे व्हिडीओ, पाकिस्तानी मौलवी तारीक जमीलचे व्हिडीओ पाठवायचा तसेच काही लिंकही पाठवायचा. त्यानंतर गेममधील विजयाच्या आमिषातून त्यांना धर्मांतरासाठी लालूच दाखवली जायची. गाझियाबादच्या एका धर्मांतरित अल्पवयीनाने सांगितले की, त्याला द युथ क्लब या पाकिस्तानी यू ट्यूब चॅनलची लिंक पाठवली गेली होती. त्यातील व्यक्ती सतत कट्टर इस्लामी शिकवण देत असे. त्यानंतर तारिक जमीलच्या व्हिडीओंचा मारा सुरू झाला व त्यातच त्याने धर्मांतर केले.

परदेशातही केले धर्मांतर

पोलिस तपासादरम्यान या अ‍ॅपच्याच माध्यमातून युरोपाच्या वेगवेगळ्या भागांतील अनेक अल्पवयीन मुलांनाही असेच धर्मांतराच्या सापळ्यात अडकवण्यात आल्याचे समोर आले आहे.

ठाण्याचा शहानवाज मास्टरमाईंड

या प्रकरणात ठाणे येथील शहानवाज खान ऊर्फ बड्डू हा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. धर्मांतराच्या या रॅकेटसंदर्भात अटक करण्यात आलेल्या गाझीयाबादच्या जामा मशिदीचा मौलवी अब्दुल रहमान याने चौकशीदरम्यान या सार्‍याची मोडस ऑपरेंडी समोर आणली आहे. सध्या शहानवाज फरार असून, महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे. त्याला लवकरच अटक करू, असे अग्रवाल म्हणाले.

Back to top button