

पाटणा : आपल्या देशात वेगवेगळे 'जुगाड' करणारे, म्हणजेच भलत्याच वस्तू जोडून भन्नाट उपकरणे तयार करणारी माणसं काही कमी नाहीत. कधी कधी त्यांच्या कल्पकतेचेही आपल्याला कौतुक वाटत असते. आता असेच काहीसे बिहारच्या बेतियामध्ये पाहायला मिळाले आहे. याठिकाणी एका व्यावसायिकाने चक्क दुचाकीवरच पिठाची गिरणी बसवली आहे. विशेष म्हणजे हे केल्यानंतर आता तो घरोघरी जाऊन हरभरा आणि गहू दळतो. तसेच या माध्यमातून उदरनिर्वाह करतो. आश्चर्याची बाब म्हणजे हा व्यक्ती दररोज 50 किलोमीटरचा प्रवास करतो.
दुचाकीवर छोटी पिठाची गिरणी लावून घरोघरी हरभरा दळणार्या दिनेशने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी ही कल्पना त्याच्या मनात आली. त्याने त्याच्या दुचाकीवर एक लहान आकाराचा ग्राईंडर बसवला आहे, तो चालवण्यासाठी पेट्रोलवर चालणारा मिनी जनरेटरही बसवला आहे. जनरेटरमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकल्यास ते सुमारे 50 किलो हरभरा दळू शकतो. दिनेशच्या म्हणण्यानुसार, त्याला एक किलो धान्य दळल्यावर 12 रुपये नफा मिळतो.
विशेष म्हणजे या कामाचा त्याला इतका आनंद मिळतो की तो या दुचाकीवर फिरत रोज 50 कि.मी.चा प्रवास करतो. दुचाकीवर चालणार्या या स्पेशल गिरणीचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुमच्या डोळ्यासमोर हरभरा किंवा गहू दळतो. त्यात ना भेसळीची चिंता आहे ना खराब दळण्याची. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, बाजारात बेसन पिठाची किंमत 150 रुपये किलो आहे; परंतु जर तुम्ही हरभरा दळून घेतला तर तो फक्त 100 रुपये किलोने मिळेल. चंपारणचे आता डझनभर लोक अशा जुगाडाच्या जोरावर आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करत आहेत.