उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मनपाच्या खतप्रकल्पात वर्षभरात ‘इतकी’ खतनिर्मिती

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या विल्होळीनजीक असलेल्या खतप्रकल्पात मागील वर्षी 13 हजार 285 मे. टन इतकी खतनिर्मिती झाली असून, मनपाच्या खताला शेतकर्‍यांबरोबरच नामांकित खत कंपन्यांकडूनही मागणी आहे. मनपाच्या याच गुणवत्तेमुळे नाशिक महापालिकेला राज्य शासनाचा 'हरित ब्रॅण्ड' प्राप्त झाला आहे.

महापालिकेमार्फत घंटागाड्यांच्या माध्यमातून दररोज शहरातील प्रत्येक घरातील केरकचर्‍याचे संकलन केले जाते. कचरा संकलन करताना त्याचे ओला आणि सुका अशा दोन प्रकारे वर्गीकरण करून ते मनपाच्या खतप्रकल्पावर प्रक्रिया करण्यासाठी पाठविले जाते. संकलित कचर्‍यापासून वीजनिर्मितीबरोबरच, आरडीएफ (कांडी कोळसा) आणि खतनिर्मिती केली जाते.

नाशिक मनपातर्फे शहरातून दररोज सुमारे 600 टनाहून अधिक कचरा संकलन केले जाते. यापैकी निम्मा कचरा हा ओल्या स्वरूपात असतो. 2021-22 या वर्षात नाशिक मनपाने 2 लाख 32 हजार 14 इतके कचरा संकलन केले. यापैकी ओल्या कचर्‍याचे प्रमाण सव्वा लाख इतके असून, ओल्या कचर्‍यापासूनच खतनिर्मिती केली जाते. साधारण एक टनामागे 10 ते 15 टक्के इतके खत तयार केले जाते. ओल्या कचर्‍यावर जैविक प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते. मनपाकडून तयार केल्या जाणार्‍या खताला नाशिकसह इतर जिल्ह्यांतील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी प्राप्त होत असून, मागील वर्षी उत्पादित झालेले सर्व खत विक्री झाले. 3,500 रुपये प्रतिटन इतका दर आहे.

केवळ शेतकरीच नाही, तर नामांकित असलेल्या खत कंपन्या आरसीएफ, जुआरी आणि चोलामंडलम या कंपन्यांकडून खतप्रकल्पातून खत उचलले जाते. संबंधित कंपन्यांकडून आपल्या कंपनीच्या लोगोसह या खताची विक्री केली जाते. मनपाकडून गुणवत्तापूर्ण खतनिर्मिती केली जात असल्याने राज्य शासनाने नाशिक मनपाच्या या खत प्रकल्पाला हरित ब्रॅण्ड प्रदान केला आहे.

सुक्या कचर्‍यापासून आरडीएफ
खतप्रकल्पात येणार्‍या सुक्या कचर्‍यापासून कांडी कोळसा अर्थात आरडीएफ तयार केले जाते. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांसह चंद्रपूर येथील सिमेंट कंपन्यांकडून आरडीएफला मोठ्या प्रमाणावर मागणी असून, बॉयलरसाठी आरडीएफचा वापर केला जातो. महिन्याकाठी सुमारे दोन हजार टन इतका कांडी कोळसा मनपाच्या खतप्रकल्पात तयार होतो. प्लास्टिक, कापड, कागद यासह जळावू वस्तूंवर प्रक्रिया करून आरडीएफ तयार केले जाते. एकूणच खत आणि आरडीएफ निर्मिती होत असल्याने खतप्रकल्पावर येणार्‍या कचर्‍याची योग्यरितीने विल्हेवाट लावली जात असल्याने मनपाचा खतप्रकल्प नाशिकच्या पर्यावरणाच्या द़ृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT