नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कन्नमवार पुलाजवळ असलेला महापालिकेचा बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प मनपाच्या पाथर्डी येथील कचरा डेपोच्या जागेत स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव स्थायी समितीच्या सभेत सोमवारी (दि.28) घेण्यात आला. सभापती गणेश गिते यांनी यासंदर्भात निर्णय घेतला. त्यास सदस्यांनी पाठिंबा देत ठराव मंजूर केला.
सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची शेवटची सभा झाली. गिते यांचा सभापतिपदाचा कालावधी संपुष्टात आला असून, या बैठकीत इतिवृत्त मंजूर करण्याबरोबरच त्यांनी गोदावरी नदी प्रदूषण तसेच शहरात प्रदूषण निर्माण होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर धूर आणि राख बाहेर पडत असल्याने त्यापासून प्रदूषण निर्माण होते. यामुळे शहराच्या वातावरणात धूर पसरून प्रदूषण तर होतेच शिवाय सांडपाणी गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्याने नदीचेही प्रदूषण होत असल्याने हा प्रकल्पच स्थलांतरित करण्याचा ठराव सभापती गणेश गिते यांनी मांडला. त्यास स्थायीच्या सर्वच सदस्यांनी पाठिंबा देत मंजुरी दिली. यामुळे आता हा प्रकल्प तत्काळ स्थलांतरित करण्याबाबत मनपा प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे.
बैठकीत गणेश गिते यांनी प्रशासनासह सर्वांचेच आभार मानत दोन वर्षे सभापतिपदाच्या काळात केलेल्या विविध कामांचा आढावा घेत माहिती दिली. याप्रसंगी समितीचे सदस्य तसेच काही नागरिकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभापती गिते म्हणाले, भाजपने सलग दोन वर्षे सभापतिपदाची संधी दिली. या दोन वर्षांच्या काळात कोरोनासारख्या महामारीचे मोठे आव्हान होते. संकटाचा सामना करण्यासाठी सभापती म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला.
अंदाजपत्रकात तरतूद
कोरोनाबाधितांना उपचार मिळण्यासाठी नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालयातील बेडची संख्या पाचशेवरून 850 पर्यंत वाढविली. दुसर्या लाटेत ऑक्सिजनचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयासह महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये 12 ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी केली. शहरात नवीन जलकुंभ, रिंग रोडसह कॉलनी अंतर्गत रस्ते विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविली. आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसारख्या महत्त्वांकाक्षी योजनांना लवकरच मूर्तस्वरूप येणार आहे. त्यादृष्टीने अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.