Nandurbar Municipal Election Result Pudhari
नंदुरबार

Nandurbar Municipal Election Result: नंदुरबार जिल्ह्यात सत्तासमीकरण बदलले; दोन पालिकांवर राष्ट्रवादी, नंदुरबारला शिंदे गट, शहाद्यात आघाडीचा झेंडा

भाजपाला नगराध्यक्षपदावर अपयश, काँग्रेस पूर्णतः नामशेष

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : एकही नगराध्यक्ष पद हाती न लागल्यामुळे जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या निवडणुक निकालातून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टीने तळोदा आणि शहादा येथील सत्ता गमावली असतानाच नंदुरबार मध्ये मात्र शिंदे गटाने वीस वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखणारा मोठा विजय प्राप्त केला आहे. चारही नगरपालिका क्षेत्रात काँग्रेस संपुष्टात येणे, आणि अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवापूर आणि तळोदा या दोन्ही ठिकाणी सत्ता प्राप्त करणे, हे यंदाच्या निवडणूक निकालातून मोठे विशेष समोर आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, नवापूर आणि नंदुरबार या चार नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडले होते. त्याची मोजणी आज अत्यंत शांततेत पार पडली. नंदुरबार येथील शासकीय गोदाम आवारात पोलीस बंदोबस्तात मतमोजणी पार पडत असताना कार्यकर्त्यांचा शिगेला पोहोचलेला उत्साह आणि विजयी उमेदवारांचा जल्लोष यामुळे चारही शहरांमधील वातावरण निवडणूकमय बनले होते.

नंदुरबारमध्ये शिवसेनेला सत्ता राखण्यात यश

आज लागलेल्या निकालांती नंदुरबार नगरपरिषदेवर शिंदे गटाचे नेते विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना वीस वर्षापासून असलेली सत्ता अबाधित राखण्यात यश मिळाले आहे. नगरसेवक पदाच्या 41 जागांपैकी तब्बल 29 जागा एकट्या शिंदे गटाने जिंकल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला फक्त आठ जागांवर विजय प्राप्त झाला. तथापि गावित परिवार किंवा भारतीय जनता पार्टीकडे शहरातील सत्ता कधीही नव्हती. त्यामुळे पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाला हाती फार काही लागले नसले तरी खूप गमावल्या सारखे सुद्धा घडलेले नाही. ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने नंदुरबार येथील नगरसेवक पदाच्या तब्बल चार जागांवर विजय मिळवला. नंदुरबार नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच असे घडले असून हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. दरम्यान, भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योजक डॉक्टर रवींद्र चौधरी, भाजपाचे विक्रांत मोरे तसेच अजित दादा गटाचे डॉक्टर अभिजीत मोरे यांनी या निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी यांना जाहीर पाठिंबा दिला होता. नंदुरबार नगर परिषदेत गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची एकहाती सत्ता आहे. चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी सौ रत्ना रघुवंशी या जवळपास 18 वर्षापासून नगराध्यक्ष पदावर आहेत. या निवडणुकीत सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाने म्हणजेच रघुवंशी यांनी पुन्हा सौ रत्न रघुवंशी यांनाच उमेदवारी दिली होती. म्हणून परिवर्तनाचा नारा देत गावित यांच्याकडून म्हणजेच भारतीय जनता पार्टी कडून अविनाश महादू माळी यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या या लढाईत सौ. रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी 10 हजार 840 इतके मताधिक्य घेऊन विजय प्राप्त केला आहे.

नवापूरात अजित गटाचा दणदणीत विजय; काँग्रेस वर्चस्व संपुष्टात

नवापूर नगरपरिषद अनेक वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात असताना यंदा मात्र काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष नाईक यांना सत्ता राखता आलेली नाही. काँग्रेसचे स्वर्गवासी दिग्गज नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी अजितदादा गटात प्रवेश करून दिलेली लढत काँग्रेसला चांगलीच महागात पडली. नवापूर नगर परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयवंत जाधव यांनी तब्बल 9 हजार 153 इतक्या घवघवीत मतांनी विजय प्राप्त केला आहे. इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 20 उमेदवार विजयी झाले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. नवापूरचे विद्यमान आमदार शिरीष नाईक हे काँग्रेस पक्षाचे असून त्यांनी काँग्रेस पक्षाचे स्वतंत्र पॅनल लढवले होते. मात्र त्यांना एकही जागा प्राप्त झाली नाही.

उमेदवार तुरुंगात; तरीही दिली तगडी लढत

माजी आमदार शरद गावित यांनी जिल्हा विकास आघाडी च्या माध्यमातून स्वतंत्र लढत दिली होती. जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बडोगे यांना ऐन निवडणुकीत गुजरात पोलिसांनी अटक केली असल्याने ते प्रत्यक्ष प्रचारात नव्हते तरीही त्यांनी जबर टक्कर दिली असे आजच्या मतमोजणीतून पाहायला मिळाले. तुरुंगात असूनही त्यांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवली.

तळोद्यात भाजपाला धक्का; राष्ट्रवादीचा विजय

शहादा विधानसभा मतदारसंघात तळोदा आणि शहादा हे दोन्ही तालुके येत असल्यामुळे शहादा आणि तळोदा या दोन्ही नगरपालिकांची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्याकडे होती. परंतु दोन्ही ठिकाणी भाजपाला जबर फटका बसला आहे. तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी या सातव्या फेरी अंती 3428 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांचा पराभव झाला आहे.

शहाद्यात इतिहासाची पुनरावृत्ती

शहादा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार होते. त्यापैकी 4 उमेदवार हे मुस्लीम होते. पण खरी लढत भाजपचे उमेदवार मकरंद पाटील आणि जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील यांच्यात झाली. तथापि या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी 1 हजार 41 मतांनी विजय प्राप्त केला असून प्रस्थापित पक्षांना हा धक्का मानला जात आहे. विशेषतः भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्यासाठी मोठा धक्का बसला आहे. शहादा नगर परिषदेवर सात वर्षापासून प्रशासक आहे. तत्पूर्वी झालेल्या निवडणुकीत आता विजयी झालेल्या अभिजीत पाटील यांचे वडील मोतीलाल पाटील यांनी भाजपाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती परंतु भाजपातून ते एकटे निवडल्याने नगराध्यक्ष भाजपाचा आणि सर्वच्या सर्व नगरसेवक मात्र काँग्रेसचे निवडून आले होते. आता पुन्हा जवळपास तसेच घडले आहे. नगराध्यक्षपदी जनविकास आघाडीचे अभिजीत पाटील विजयी झाले आहेत तथापि त्यांच्या आघाडीचे फक्त नऊ नगरसेवक जिंकले असून भारतीय जनता पार्टीचे तब्बल 20 नगरसेवक निवडून आले आहेत.

नंदुरबार येथे रिकाउंटिंगमुळे खोळंबा

नंदुरबार येथील प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे उमेदवार दीपक दिघे आणि भाजपाचे उमेदवार श्याम मराठे यांच्यात चुरस होती. प्रत्यक्ष मतमोजणीतही तसेच आढळून आले. दोन्ही उमेदवारांना प्राप्त झालेली मध्ये मोजून झाल्यावर फक्त 31 मतांचा फरक आला होता. त्यामुळे श्याम मराठे यांना प्राप्त झालेल्या मतांवर हरकत नोंदवून दीपक दिघे यांनी रिकॉउंटिंगची मागणी केली. त्यामुळे बराच वेळ मतमोजणी खोळंबलली राहिली. रंगतदार लढाई झाली असल्यामुळे दोन्ही उमेदवार विजयाचा दावा करत असतानाच मात्र रिकॉउंटिंग नंतर दीपक दिघे यांना 17 मतांनी विजयी असल्याचे घोषित करण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातील निवडणूक निकालानंतर स्पष्ट झालेले पालिका निहाय पक्षीय बलाबल असे:

तळोदा नगरपालिका

एकूण प्रभाग 10

नगरसेवक पदाच्या जागा 21

राष्ट्रवादी काँग्रेस - 21 विजयी

शिवसेना - 6 विजयी

भाजपा - 4 विजयी

नगराध्यक्ष राष्ट्रवादी - भाग्यश्री योगेश चौधरी

3 हजार 428 मतांनी विजयी

नवापूर नगरपालिका

एकूण प्रभाग 10

नगरसेवक पदाच्या जागा 20

राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) - 17 विजयी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 02 विजयी

भाजपा 01 विजयी

नगराध्यक्ष पदी : अजितदादा गटाचे उमेदवार जयवंत जाधव अंतिम फेरीत 3 हजार 828मतांनी विजयी

शहादा नगरपरिषद

नगरसेवक पदाच्या एकूण जागा 29

भारतीय जनता पार्टी - 20

जनता विकास आघाडी - 9

नगराध्यक्ष : जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील 1041 मतांनी विजयी

मिळालेली मते

अभिजीत पाटील 18 हजार 798

मकरंद पाटील 17 हजार 758

नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार

नंदुरबार नगरपरिषद नगराध्यक्षा सौ रत्ना रघुवंशी

तळोदा नगरपरिषद नगराध्यक्ष सौ भाग्यश्री चौधरी

शहादा नगराध्यक्ष अभिजीत पाटील

नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT