

नंदुरबार - श्री एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमित्त सारंगखेडा येथे भरवल्या जाणाऱ्या चेतक फेस्टिवल मधील घोडेबाजाराने यंदाही कोटीची उड्डाणे घेतली आणि सुमारे चार कोटी रुपयांच्या उलाढालीची विक्रमी नोंद केली. आता यात्रा अंतिम टप्प्यात असल्यामुळे यात्रेकरूंचा उत्साह ओसरत असला तरी रुबाबदार देखण्या घोड्यांच्या आठवणी समस्त घोडे प्रेमींनी नक्कीच हृदयात साठवल्या आहेत.
दरवर्षाप्रमाणे यंदाही सारंगखेडा येथील अश्व बाजारात कोट्यावधी रुपये किमतीचे घोडे विविध प्रांतांतून आले होते. 15 कोटी, 10 कोटी, 5 कोटी अशी कोटीची उड्डाणे घेणाऱ्या किमती असलेले देखणे रुबाबदार घोडे यंदाही आकर्षण ठरलेच परंतु एक लाखापासून 25 लाखापर्यंत किंमत असलेल्या सामान्य घोड्यांची सुद्धा चांगली उलाढाल झालेली दिसली. डोळे विस्फारून जातील एवढ्या किमती सांगितल्या जाणाऱ्या त्या सर्व प्रमुख घोड्यांची खरोखर विक्री किंवा खरेदी मात्र येथे घडली नाही, ते केवळ स्पर्धा गाजवण्यासाठी आले होते; असे माहितगार सूत्रांकडून सांगण्यात आले. मैदान गाजवणाऱ्या रुबाबदार घोड्यांमध्ये गुजरातचा 'ब्रम्ह्योस', तामिळनाडूचा विनायक ,
राजस्थानचा गुलमस्थान , दमनचा गोल्डी , महाराष्ट्राचा टायसन , मध्यप्रदेशची रुद्राणी, पंजाबचा बादल आदींचा समावेश होता. यंदाच्या येथील चेतक फेस्टिवलमध्ये ते खरे आकर्षण ठरले. अश्व स्पर्धांच्या मैदानांचे बादशाह असलेले हे अश्व येथील चेतक स्पर्धांचे जणू मुख्य अतिथी होते. या रुबाबदार घोड्यांमुळे स्पर्धा देखील चांगल्याच गाजल्या. चेतक फेस्टिवल मध्ये ४ डिसेंबर पासून अश्व रेवाल चाल ,नृत्य स्पर्धा , नुकरा प्रजातीच्या सौंदर्य स्पर्धा वगैरे विविध स्पर्धां प्रमाणेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले. या स्पर्धांमध्ये विविध प्रांतातून आलेल्या देखण्या व सुंदर अश्वांनी सहभाग नोंदवून मैदान गाजवले. उपस्थित प्रेक्षकांचे अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडले.
दरम्यान, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माहितीनुसार सारंगखेडा येथील श्री दत्तप्रभूच्या यात्रेत यंदा घोडे बाजारातील उलाढालीचा नवा उच्चांक नोंदला गेला. यंदा अश्व खरेदी विक्रीत तीन कोटी ८६ लाख दोन हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली. गेल्यावर्षी तीन कोटी ८४ लाख ९८ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा येथे घोड्याला मिळालेली सर्वाधिक किंमत ११ लाख ११ हजार १११ रुपये राहिली. कृषी उत्पन्न बाजार समिती कडील आकडेवारीनुसार अश्व शौकिनांनी येथून तब्बल ७०२ घोडे खरेदी केले आहेत.दरम्यान बुधवारी १८ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीच्या ३२ घोड्यांची विक्री झाली. पुढील चार-पाच दिवसात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता सांगितली जात आहे. तथापि यात्रा समाप्तीच्या टप्प्यात आहे. गेल्यावर्षी १,८१० घोडे विक्रीसाठी आणले गेले होते. त्यापैकी ८५७ घोड्यांची विक्री झाली होती. पुढील सात ते आठ दिवस यात्रा सुरू राहणार आहे.