

नंदुरबार : आमदार आमश्या पाडवी यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी घरकुलांचे लाभ घेताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करावी; अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज केली. यामुळे सदनिका घोटाळा अंगाशी आल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद गमवावे लागल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत असतानाच आता एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आमश्या फुलजी पाडवी यांचे घरकुल प्रकरण चर्चेत आले आहे.
या प्रकरणात अक्कलकुवा तालुक्यातील विद्यमान आमदार आमश्या फुलजी पाडवी हे स्वतः कुटुंबप्रमुख असून त्यांचे पूत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती शंकर पाडवी, त्यांच्या पत्नी सौ.जावराबाई, सौ. रेखाबाई यांनी विविध प्रकारचे मालमत्ता आणि संयुक्त रेशन कार्ड असतानाही संगनमताने शासनाची फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटलेले आहे. कारवाईची मागणी करणारे हे निवेदन आज दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग हुन्या वसावे, प्रताप आतऱ्या वसावे, भाजपाचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष नितेश रायसिंग वळवी, रामसिंग वळवी, जगदिश पाडवी, एडवोकेट सुधीर पाडवी आणि अन्य यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मागणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माणिकराव कोकाटे यांच्यावर ज्याप्रमाणे कारवाई झाली त्याच धर्तीवर पाडवी यांच्या प्रकरणातही तातडीने चौकशी करून कारवाई केली जाणे अपेक्षित आहे. याच्यापूर्वी देखील अधिकाऱ्यांना पुरावे देऊन झालेत परंतु आता त्यांनी दखल घेतली नाही तर लवकरच आमरण उपोषण आणि तत्सम आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला.
दरम्यान, निवेदनात म्हटले आहे की, सदर प्रकरणात एकाच कुंटुंबातील सदस्य असून तसेच संयुक्त रेशनकार्ड धारक असतानाही, शासनाने निश्चित केलेल्या नियम व निकषांचे उल्लंघन करून तिहेरी स्वरूपात घरकुल योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, कुटुंबप्रमुख स्वतः विद्यमान आमदार व लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती, शेती, पक्के बंगले तसेच त्यांच्या दोन्ही पत्नीच्या व मुलाचा नावावर वाहने व इतर स्थावर व जंगम मालमत्ता अस्तित्वात आहेत. असे असतानाही केवळ अत्यंत गरीब, बेघर, निराधार व दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनेचा गैरफायदा जाणीवपूर्वक घेतलेला आहे.
सौ. जवराबाई आमश्या पाडवी यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलचा लाभ घेतलेला असून, सौ. रेखाबाई आमश्या पाडवी यांनी शबरी घरकुल योजनेअंतर्गत घरकुलचा लाभ घेतलेला आहे. तसेच श्री. शंकर आमश्या पाडवी प्रधानमंत्री (ग्रामीण) अंतर्गत घरकुलचा लाभ घेतलेला आहे. हे तिन्ही लाभ एकाच कुंटुंबात, एकाच रेशनकार्ड अंतर्गत व अपात्र असतानाही मंजूर करण्यात आलेले असून ही बाब पूर्णपणे बेकायदेशीर, नियमबाह्य व शासनाची फसवणूक करणारी आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत कोयलीविहीर येथील तात्कालीन व विद्यमान सरपंच तसेच कुंटुंबप्रमुख श्री. आमश्या फुलजी पाडवी यांनी आपल्या पदाचा, अधिकारांचा व राजकीय प्रभावाचा गैरवापर करून खोटे व बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रस्ताव तयार करून त्यांच्या दोन्ही पत्नींच्या व मुलाचा नावाने घरकुल योजनेचा लाभ मिळवून शासनाच्या निधीचा अपहार करून गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार व फसवणूक केली आहे.
या बाबतची सविस्तर तक्रार दिनांक: 16/09/2025 रोजी प्रत्यक्ष आपल्या दालनात हजर राहून सादर करण्यात आलेली होती. मात्र सदर तक्रारीस आजपर्यंत सुमारे चार महिन्यांचा कालावधी उलटून देखील कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, तसेच तक्रारदारास याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, याचा आम्हाला तिव्र खेद वाटतो. सदर प्रकरणाची तात्काळ सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणांऱ्या सर्व व्यक्तींविरुद्ध तातडीने गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच शासनाच्या घरकुल योजनेतील अपहार रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी. असेही निवेदनात म्हटलेले आहे.