

नंदुरबार - सारंगखेडा येथील प्रसिद्ध एकमुखी श्री दत्त यात्रेतील चेतक फेस्टिवल अंतर्गत विविध स्पर्धांना आता सुरुवात झाली असून आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी घोडेस्वार आणि बुलेट स्वार यांच्यातील रंगलेल्या अनोख्या स्पर्धेने प्रेक्षकांचा आनंद उंचीवर नेला. यासोबतच नृत्य करणारे घोडे पर्यटकांचा आनंद वाढवू लागले आहेत.
घोड्यांच्या विविध प्रजाती विक्रीसाठी आणल्या जातात यासाठी चेतक फेस्टिवल ओळखला जातोच त्याशिवाय घोड्यांच्या नृत्य स्पर्धा, घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धा, घोड्यांची रेस यासाठी सुद्धा हा फेस्टिवल ओळखला जातो. यंदा नंदुरबार नजीकच्या म्हणजे गुजरात राज्यातील कुकरमुंडा तालुक्यातील सद्गव्हाण येथील अजय चव्हाण यांचा येथे आलेला प्रिन्स हा घोडा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. प्रिन्स हा मारवाड जातीचा असून, त्याच्या नृत्य अदाकारीमुळे कमी वेळेत तो प्रसिद्ध झाला. तो इशाऱ्यावर यात्रेत दोन पायावर नृत्य करण्यासह नित्याचे विविध प्रकार व प्रात्यक्षिक करून दाखवतो. हा प्रिन्स घोडा चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी सारंगखेडा यात्रेतच खरेदी केला होता. त्यास विशेष प्रात्यक्षिक देऊन पुन्हा येथेच नृत्य स्पर्धा व अन्य स्पर्धांसाठी आणल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान चेतक फेस्टिवल अंतर्गत दरवर्षी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात दिनांक ६ डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा (इयत्ता 1 ली ते 10 वी विद्यार्थी) आणि शिक्षकांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. आज दिनांक 8 डिसेंबर रोजी बुलेट मोटरसायकल आणि घोडेस्वार यांच्यातील शर्यत रंगवणारी अनोखी स्पर्धा पार पडली. वेगवान बुलेट ची बरोबरी करू पाहणाऱ्या घोडेस्वरांचा तो खेळ पाहताना प्रेक्षक हरकून गेले. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या दरम्यान वेगवेगळ्या अश्व स्पर्धा रंगणार आहेत.
रुद्राणी घोडी बनली प्रमुख आकर्षण
याठिकाणी देशभरातून विविध भागातील सुमारे ३ हजारांवर घोडे दाखल झाले आहेत. या घोड्यांची किंमत लाखापासून कोट्यवधी रुपये पर्यंत सांगितली जात आहे. घोड्यांची किंमत त्याची उंची, राहणीमान, त्यांची ठेवण, खानपान, जातीवंत आहे काय, यावरुन ठरत असते. बादल, ऐश्वर्या, पदमिनी, बादशा, शहनशा आदी नावाच्या वैशिष्ट्यपूर्ण घोड्यांनी आतापर्यंत सारंगखेडा यात्रेत बड्या किमतीचा इतिहास रचला असून त्यांनीच सारंगखेडा यात्रेला जबरदस्त क्रेझ मिळवून दिली आहे.
घोड्यांची नावे, त्यांचा आहार, त्यांचं रंगरुप, त्यांच्या किमती संगळे काही लोकचर्चेचा विषय बनलेले असतात. यंदा रुद्राणी नावाची आकर्षक घोडी चर्चेचा विषय बनली आहे. रुद्राणी ही २२ महिन्यांची असून मारवाडी जातीची आहे. तिची उंची ६५ इंचपेक्षा अधिक असून या वयातील ही सर्वात उंच घोडी असल्याने आणि ती जातीवंत असल्याने तिला महागडी बोली लागत असल्याचे तिच्या मालकांचे म्हणणे आहे.
हरभरे आणि तांदळाचा भुस्सादेखील खायला दिला जात असून रोज दोन वेळा तासभर तिचा मोहरीच्या तेलाने मसाज केला जात असल्याचेही तिचे मालक सांगतात. तथापि चेतक फेस्टिवल मध्ये येणारे सर्वच घोडे विक्रीसाठी येत नाहीत. घोडे खरेदी विक्री करणाऱ्या स्टडफार्म चा येथे नेहमी सहभाग असतो. त्या संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार किंमती घोडे ते फक्त येथील प्रदर्शनासाठी आणि स्पर्धांसाठीच आणतात. प्रत्यक्षात विक्री करत नाहीत.