जळगाव: एम.आय.डी.सी. भागातील वखार महामंडळाच्या गोडाऊन परिसरात अमली पदार्थांची उघड-उघड विक्री करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळत जळगाव एलसीबी व एमआयडीसी पोलिसांनी एमडी तस्करीचा मोठा रॅकेट उद्ध्वस्त केला आहे. गुरुवारी (३१ जुलै) रात्री १०.४० च्या सुमारास मारलेल्या छाप्यात ६२.०७ ग्रॅम घातक 'एमडी' ड्रग्ज, मोबाईल आणि दुचाकी असा तब्बल ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या मालेगावच्या मुख्य सूत्रधारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर क्र. A-14, एफसीआय गोडाऊनसमोरील रस्त्यावर एक इसम अमली पदार्थांची खरेदी-विक्री करण्यासाठी येणार असल्याची पक्की बातमी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून झडती घेतली असता, त्याच्याकडून वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये डांबून ठेवलेला घातक एमडी ड्रग्जचा साठा आढळला.
अटक केलेला आरोपी इम्रान खान हयात खान (वय ३६) (मूळ रा. आडगाव, ता. जळगाव; सध्या रा. करीम नगर, फातिमा नगर, एम.आय.डी.सी., जळगाव) असा आहे. पोलीस तपासात या ड्रग्जची रसद मालेगाव (जि. नाशिक) येथील रफीक उर्फ 'गोल्डन' याने पुरवल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावरही सह-आरोपी म्हणून गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरू आहे.
उघड्या स्वरूपातील एमडी ३९.०६ ग्रॅम १ लाख ९६ हजार ,प्लास्टिक पिशव्यांमधील एमडी (११ पिशव्या) ९.१० ग्रॅम ३६ हजार,प्लास्टिक पिशव्यांमधील एमडी (१८ पिशव्या) १३.९१ ग्रॅम ५६ हजार, रिअलमी (Realme) कंपनीचा मोबाईल १ नग २० हजार, हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल १ नग ५० हजार, असे एकूण एमडी ड्रग्ज ६२.०७ ग्रॅम जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६३५/२०२६ नुसार अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act, 1985) मधील कलम ८(क), २२(क), २९ सह भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.फौ. अतुल रघुनाथ वंजारी यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करत आहेत.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
"जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करांविरुद्ध धडक मोहीम सुरूच राहील. कोणत्याही नागरिकाला अवैध अमली पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल."