

जळगाव : आषाढी एकादशीचे औचित्य साधून तिफन फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित "शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी" या अभिनव उपक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत "घेऊन हाती मूठभर माती, करूया शेतीची वारी" या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरविले. त्यांनी शेतशिवारात जाऊन माती हातात घेत शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी पंढरीची वारी केली.
यावेळी जिल्हाधिकारी घुगे यांनी शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि अर्थव्यवस्थेचे अधिष्ठान असल्याचे सांगितले. शेतकरी हा खऱ्या अर्थाने अन्नदाता असून त्याच्या कष्टाला समाजाने सन्मान दिला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.
आषाढी वारीच्या भक्तिमय परंपरेला कृषी संस्कृतीची जोड देणाऱ्या या उपक्रमातून शेती, माती आणि शेतकरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उपस्थित शेतकरी, कृषी अधिकारी आणि ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करत शेतीबाबत जनजागृती आणि शाश्वत कृषीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक सुभाष काटकर यांनी सहभागी होत अभियानास शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी व उपसंचालक भरत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.