उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 14 मध्ये नगरसेवकांसह इच्छुकांना फटका, हरकतींमध्ये वाढ

गणेश सोनवणे

सातपूर : पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते हरकती व सूचना नोंदविण्यासाठी पुढे येत आहेत. सातपूर विभागात नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्र. 14 मध्ये नगरसेवकांसह इच्छुकांना फटका बसला असून, अनेकांनी हरकती नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेच्या आठव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 44 प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वेळी चार नगरसेवकांचा प्रभाग होता. मात्र, यंदा तीन नगरसेवकांचा प्रभाग आहे. या प्रभागरचनेचा आराखड्यात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. सातपूर विभागातील नव्याने स्थापन झालेला प्रभाग क्रमांक 14 याला अपवाद राहिला नाही.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 14 मध्ये महाराष्ट्र हाउसिंग सोसायटी, सातपूर कॉलनी, अशोकनगर, जाधव संकुल, सावरकरनगर, समतानगर, राज्य कर्मचारी सोसायटी व सातपूर गाव आदी परिसराचा समावेश आहे. या प्रभागाचे दोन भाग करून यात सातपूर गावाचा समावेश केला आहे. वास्तविक, सातपूर गाव हे हायवे क्रमांक 848च्या दुसर्‍या बाजूला आहे. तर एकाच ठिकाणी असलेल्या सातपूर कॉलनीचे दोन भाग करून अर्धा भाग प्रभाग क्र. 14 मध्ये, तर अर्धा भाग प्रभाग क्र. 15 मध्ये समाविष्ट केला आहे. अगदी जवळ जवळ असलेले प्रभाग एकत्र करून घ्यावेत व सातपूर गाव यातून वगळण्यात यावे. तसेच नकाशानुसार ए (अ) क्षेत्र सातपूर वसाहतीचे क्षेत्र आहे. ते एमआयडीसी परिसरात जोडले गेले आहे. तर बी (ब) क्षेत्र सातपूर गावचे क्षेत्र आहे. ते अबाधित ठेवणे आवश्यक असताना ते त्र्यंबक रस्ता ओलांडून सातपूर वसाहतीला जोडले गेले आहे. 'अ'आणि 'ब' ही दोन्ही क्षेत्रफळ अखंडित वस्ती भागातून विनाकारण खंडित झाले आहे.

अशा प्रकारच्या हरकती मनसेचे शाखाध्यक्ष सोमनाथ पाटील, विभागीय अध्यक्ष मनसे योगेश लभडे,
शिवसेनेचे माजी महानगर उपप्रमुख वैभव ढिकले, माजी विभागप्रमुख रणजित हिंगमिरे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, पश्चिम विधानसभा सरचिटणीस महेश तुपे आदींसह सचिन देसले, पुंडलिक बोडके, प्रवीण वाघ यांनी हरकती नोंदवल्या आहेत.

जर हा प्रभाग असाच राहिला तर या प्रभागातील नगरसेवकांकडे संपर्क साधणे अवघड जाईल. स्थानिक विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय होऊ शकते. ही अडचण लक्षात घेत निवडणूक आयोगाने प्रभागरचना दुरुस्त करावी.
नगरसेवकांसह अनेक इच्छुकांना फटका

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा ;

SCROLL FOR NEXT