नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 1 चे समीकरण मुर्तडक-बागूल यांच्या निर्णयावरच | पुढारी

नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 1 चे समीकरण मुर्तडक-बागूल यांच्या निर्णयावरच

पंचवटी : रवींद्र आखाडे : नव्या प्रारूप प्रभागरचनेत जुन्या 6 चा काही भाग वगळून क्रमांक 1 झालेल्या नव्या प्रभागात पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणार्‍या मुर्तडक-बागूल यांची नवी पिढी यंदा मैदानात उतरण्याची चिन्हे आजघडीला दिसत असली तरी अद्याप हे स्पष्ट झालेले नसल्याने उभय नेत्यांच्या अंतिम निर्णयावरच या प्रभागाचे राजकीय समीकरण अवलंबून आहे.

चारसदस्यीय पद्धतीमुळे मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक, भाजपच्या विद्यमान उपमहापौर भिकूबाई बागूल, सुनीता पिंगळे आणि पुंडलिक खोडे हे सध्या या प्रभागाचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, यंदाच्या नव्या त्रिसदस्यीय रचनेत जुन्या प्रभाग 6 मधील क्रांतीनगरसह हनुमानवाडीचा काही भाग वगळून उर्वरित परिसराचा नवीन प्रभाग क्र.1 तयार केला आहे. आजवर प्रत्येक निवडणुकीत या भागाने सेना-भाजपकडेच नेतृत्व सोपवले असले तरी मुर्तडक यांच्या रूपाने मनसेनेही दोनदा नगरसेवकपद राखले. नगरसेवक मुर्तडक प्रभाग 1 मधून लढणार की 8 मधून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रभाग 1 मधून त्यांचे चिरंजीव विशाल आणि कन्या व आंतरराष्ट्रीय तलवारबाज खेळाडू रोशनी यांचीही नावे पुढे आली आहेत. दुसरीकडे, सुनील बागूल यंदा शिवसेनावासी झाले आहेत. त्यांनी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष असलेले चिरंजीव मनीष बागूल यांना यंदा मैदानात उतरविण्याचे निश्चित केले आहे. मात्र, ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे मात्र स्पष्ट नाही.

छाया काकड या यंदा मात्र भाजपकडून इच्छुक आहेत, तर मुर्तडक यांच्यासमोर लढलेले दामोदर मानकर तसेच नगरसेविका सुनीता पिंगळे यांच्यासह विमल आखाडे, प्रा. वैशाली आहेर, ज्ञानेश्वर काकड, वाळू काकड, प्रमोद पालवे हे भाजपकडून इच्छुक आहेत.

अ‍ॅड. सुरेश आव्हाड, मोतीराम पिंगळे, महेश शेळके, विक्रम कडाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आप्पा शिंदे, धनंजय डोळस, अंकुश काकड, चिंतामण उगलमुगले, सागर चव्हाण हे शिवसेनेकडून, तर अनिल भडांगे हे प्रहारकडून इच्छुक आहेत. तसेच, डॉ. जगन्नाथ तांदळे, गणेश शेलार, दीपक पिंगळे, कल्पना पिंगळे, विद्या पिंगळे हेदेखील इच्छुक आहेत.

असा आहे प्रभाग 1..
रामवाडी, आदर्शनगर, कौशल्यानगर, तळेनगर, हनुमानवाडी, प्रोफेसर कॉलनी, मोरे मळा, कोशिरे मळा, चौधरी मळा, वडजाई मातानगर, मखमलाबाद गाव, मखमलाबाद गावठाण, शांतीनगर, विद्यानगर, मानकरनगर, इंद्रप्रस्थनगर, तवली फाटा परिसर.

भविष्यातील विचार करून प्रभागात ड्रेनेज लाइन टाकायला हव्यात. विशेषतः पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीने या लाइन्स असाव्यात. सध्या एकाच बाजूने ड्रेनेज लाइन आहेत.
– प्रकाश दुबे, निवृत्त सरकारी कर्मचारी

लोकप्रतिनिधींनी विकासकामे करताना केवळ शहरी भागावर लक्ष न देता गावठाण भागाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या प्रभागात गावठाण भाग हा महत्त्वाचा मानला जातो. प्रभागातील मुलांची संख्या बघता एका भव्य क्रीडांगणाचीही गरज आहे.

– अ‍ॅड. अमोल घुगे,
स्थानिक नागरिक

केंद्र, राज्य शासनाबरोबरच मनपाच्या विविध समाजो-पयोगी योजना आहेत. या योजना पोहोच-विण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागात मनपाचे सर्व सुविधांयुक्त रुग्णालय असायला हवे. 

– सागर विंचू, स्थानिक नागरिक

मळे परिसरात कुठल्याही प्रकारची कामे झालेली नाहीत. रस्ते, वीज, घंटागाडी आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नवीन वसाहतींमध्ये रस्ते, पथदीप यांसह पिण्याच्या पाण्याची व ड्रेनेज लाइन नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.
– महेश कर्पे, स्थानिक नागरिक

लोकप्रतिनिधींनी केवळ रस्ते, वीज, पाणी यापेक्षा युवा व विद्यार्थिवर्गाचा विचार करून शैक्षणिक विकासकामे व योजनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विद्यार्थिवर्गाला अपेक्षित सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणारा लोकप्रतिनिधी असावा.
– शुभम चिने, उद्योजक तथा स्थानिक नागरिक

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button