उत्तर महाराष्ट्र

‘तो’ बॉम्बगोळ्यांचा कानठळ्या बसविणारा आवाज, जिवाचा उडणारा थरकाप अन्

गणेश सोनवणे

मालेगाव (जि. नाशिक) : सुदर्शन पगार
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या फायनल पेपरच्या तयारीची चिंता सतावत असताना 24 तारखेला आमच्या शहरावर पहिला हल्ला झाला. ड्रोन घिरट्या घालताना दिसत होते. तेव्हापासून फायरिंग आणि बॉम्बगोळ्यांचा कानठळ्या बसविणारा आवाज जिवाचा थरकाप उडवत होता. यातून केव्हा आणि कसे बाहेर पडणार हा एकच प्रश्न मनात घर करून होता. हे शब्द आहेत, जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या तोंडावर नेऊन ठेवलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे ओडेसा (युक्रेन) शहरातून मायदेशी परतलेल्या वृषभ देवरे या विद्यार्थ्याचे. शुक्रवारी तो दिल्लीत आणि शनिवारी मालेगावात दाखल झाला.

ऑपरेशन गंगा अंतर्गत सुरक्षित घरवापसी झाली असली, तरी ती भीती वृषभच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होती. पत्रकारांशी बोलताना त्याने सांगितले की, वैद्यकीय शिक्षणासाठी तो ओडेसा विद्यापीठात सहा वर्षांपूर्वी दाखल झाला होता. आता केवळ अखेरचे तीन महिने राहिले होते. मुख्य परिक्षेची तयारी सुरू असतानाच युद्धाचे ढग गर्दी करू लागले. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी अन्नपदार्थांचा साठा केला होता. 24 फेब्रुवारीला पहिला हल्ला झाला आणि सर्वच स्तब्ध झाले. एअर स्ट्राइक झाले. भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता, त्यांनी थेट मदत अशक्य असल्याचे स्पष्ट करीत काहीही करून बॉर्डरपर्यंत पोहोचण्याची सूचना केली. ओडसापासून मालदोव्ह बॉर्डर फक्त दीडशे किमी होती. परंतु, तेथे जाणे शक्य नसल्याने रोमानियाला जाण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे चौपट भाडे देऊन आम्ही 50 विद्यार्थ्यांनी एक खासगी बस घेतली.

जवळील रोमानियाची सीमा 500 किलोमीटरवर होती. एरवी हे अंतर 10 तासांत कापणे शक्य असले, तरी आम्हाला तब्बल 25 तास लागले. रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे साधारण 15 किमी पहिलेच आम्हाला उतरवून देण्यात आले. युक्रेनचे सैनिक फक्त स्थानिक नागरिकांनाच प्राधान्य देत होते. रशियाच्या हल्ल्याची भीती आणि त्यात उणे 7 अंश तापमानात निराधार राहण्याचा अनुभव शब्दांत सांगणे कठिण असल्याचेही तो म्हणाला.

अखेर सीमा ओलांडली आणि भारत सरकारच्या विमानात प्रवेश झाला तेव्हा कुठे आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. परिस्थिती तणावपूर्ण होती मात्र युद्ध होईल असे वाटले नव्हते. आता परिस्थिती केव्हा सामान्य होणार आणि विद्यापीठ परीक्षेबाबत काय निर्णय घेते, याकडे डोळे लागले असल्याचे तो म्हणाला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT