निपाणी -राधानगरी मार्गाची दुर्दशा चंद्रकांत पाटलांची देणगी : आ. प्रकाश आबिटकर | पुढारी

निपाणी -राधानगरी मार्गाची दुर्दशा चंद्रकांत पाटलांची देणगी : आ. प्रकाश आबिटकर

मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा “निपाणी राधानगरी या मार्गाची दुर्दशा ही माजीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली महान देणगी आहे”, असा टोला लगावतया रस्त्याची सध्याची स्थिती पाहता ठेकेदाराच्या इच्छेनुसार राज्य चालते अशी या ठेकेदारांची भावना झाली आहे”. अशी टीकाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला. मुरगुड (ता. कागल) येथे बसस्थानक परिसरात खासगी भेटप्रसंगी नागरीक व पत्रकारांशी संवाद साधताना  ठेकेदार कंपनीच्या कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 निपाणी -राधानगरी रस्त्याच्या दुर्दशेला सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार आहे. गेल्या दोन वर्षापासून ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची नुसतीच वल्गना हा विभाग करत आहे; पण त्याचा परिणाम म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यामध्ये लटकणार आहेत. म्हणून वेळ काढूपणा सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःची कातडी वाचवण्यासाठी या रस्त्यावर सामान्य नागरिकांचा जीव गेला तरी त्याची पर्वा करणार नाही. असे वागत आहेत.

 संबंधितांची मुजोरी जनतेने त्याच वेळेस मोडून काढायला हवी होती

या रस्त्याच्या प्रश्नी आपण वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार्‍यांकडे  पाठपुरावा केला; पण संबंधित अधिकारी कंपनीच्या दबावाखाली याकडे दुर्लक्ष करत आहेत. ठेकेदार कंपनी व संबंधितांची मुजोरी त्याच वेळेस जनतेने मोडून काढायला हवी होती, असेही त्‍यांनी सांगितले.

रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि दिरंगाई याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर तातडीने संबंधित अधिकाऱ्याला मंत्रालयातून फोन येतात.  ही कारवाई थांबवली जाते, अशी नागरिकातून चर्चा आहे याबाबत आमदार आबिटकर म्हणाले, “ठेकेदार कंपनीची राज्य स्वतःच्या इच्छेनुसार चालते अशी भावना झाली आहे.” यावेळी दत्तात्रय मंडलिक, आनंदा मांगले, अनिल राऊत ,नगरसेवक संदीप कलकुटकी, नवनाथ सातवेकर, रणजीत भारमल, संदीप वड्ड, प्रशांत शिरसेकर विशाल मगदूम  आदी उपस्थित होते.

 पाहा व्हिडीओ : व्यथा कांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या झोरे कुटुंबाची | A village with only one Family

 

Back to top button