उत्तर महाराष्ट्र

धुळे शहराच्या ‘जलजीवन मिशन’च्या कामांना गती द्या : गुलाबराव पाटील

अमृता चौगुले

धुळे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील सर्व कुटुबांना सन 2024 पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. जलजीवन अभियानांतर्गत नळजोडणी देवून पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.18) 'जल जीवन मिशन'च्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा (धुळे), मनीषा खत्री (नंदुरबार), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. (धुळे), रघुनाथ गावडे (नंदुरबार), धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता भुजबळ आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, 'हर घर नल से जल' नुसार प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापूर्वी राबविलेल्या विविध योजनांच्या अस्तित्वातील साधनांचा वापर करून व आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करून योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) करणे आवश्यक आहे. ज्या तालुक्यात जास्त योजनांचा समावेश आहे, अशा तालुक्यात अन्य तालुक्यातील मनुष्यबळाचा वापर करून या योजनांची कामे पूर्ण करावीत. या माध्यमातून या कामांना गती देत ती तातडीने पूर्ण करावीत. योजनांच्या पूर्ततेसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेवून तातडीने कार्यादेश देत पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होतील, अशी दक्षता घ्यावी. पुनर्जोडणीच्या कामांच्या पूर्ततेसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार करावा, असेही निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

पाणीपुरवठा योजनांच्या कामांपुर्वी पाण्याची उपलब्धता असल्याची खात्री करून घ्यावी. पाणीपुरवठा योजनांची पूर्तता करतानाच सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठी दिलेल्या लोकसंख्येच्या निकषांचे पालन करावे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक गावाच्या ग्रामसभेचा ठराव घ्यावा. म्हसदी (ता. साक्री) येथील पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असेही निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात तीन लाख पाच हजार घरे असून नळजोडणीद्वारे पाण्याची सुविधा दोन लाख 90 हजार 450 घरांना देण्यात आली आहे. उर्वरित 14 हजार 610 घरांना लवकर नळाद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यासाठी एकूण 532 योजना प्रस्तावित असून त्यात 538 गावांचा समावेश आहे. त्यापैकी 453 प्रकल्प अहवाल मंजूर झाले आहेत, तर तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी 435 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी 398 योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहेत. 282 योजनांच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले असून 219 कामे पूर्णत्वास आल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पढ्यार, उपमुख्य कार्यकारी अभियंता प्रदीप पवार यांनी आपापल्या विभागाची माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेमंत साळुंखे, डॉ. तुळशीराम गावित, मनोज मोरे यांनी पाणीपुरवठा योजना, स्वच्छता, धुळे शहरासाठीच्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना याविषयावर झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT