धुळे : नगरसेवकांना निधी वाटपात सापत्न वागणूक : पालकमंत्री गुलाबराव पाटील | पुढारी

धुळे : नगरसेवकांना निधी वाटपात सापत्न वागणूक : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे पालकमंत्री संबंधित जिल्ह्याच्या नगरपालिका आणि महानगरपालिका यांना निधीचे वाटप करतात. मात्र, संस्थांमधील सत्ताधारी हे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये काम करण्यास निधी देत नसल्याचे वास्तव राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केले आहे.

धुळ्यात आढावा बैठकीसाठी सोमवारी (दि. १८) गुलाबराव पाटील यांचे आगमन झाले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धुळे जिल्ह्यात सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या प्रभागांत कामासाठी निधी देत नसल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीचा पैसा घ्यायचा आणि त्यांच्याच नगरसेवकांना पैसे दिले जात नसल्याचा प्रकार सुरू आहे. नगरपालिकेच्या प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून आले असतील, तरीही त्याच प्रभागांमधील बऱ्याच नागरिकांनी भारतीय जनता पक्षालादेखील मतदान केले आहे. त्याबाबतचा विचार संस्थांच्या सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे. तो विचारच होत नसल्याचे मत ना. पाटील यांनी व्यक्त केले. राज्यात सध्या मराठवाडा आणि कोकण वगळता, ४२ गावांमध्ये टॅंकर सुरू आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण कमी होते. त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस पाहता, तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही ना. पाटील यांनी यावेळी सांगितले. राज्यात जलजीवन मिशनअंतर्गत ४० लिटरऐवजी ५५ एलटीडी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. विजेमुळे बऱ्याच योजना कायमस्वरूपी बंद होतात. त्यामुळे नवीन योजना, अंदाजपत्रक तयार करताना सोलरचा समावेश केला जावा, असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. सोलरवर असलेल्या योजना बंद पडणार नाही. त्याचप्रमाणे गैरसोय होणार नसल्याने त्यावर उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांत शिवसेनेचे संघटनात्मक काम समाधानकारकपणे सुरू आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तर शिवसेनेचे काम नसताना, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एका जागेवर अवघ्या 1200 मतांनी उमेदवाराला पराभव पत्करावा लागला, तर धडगाव नगरपालिकेमध्ये शिवसेना नसतानाही, नगरपालिका आता शिवसेनेच्या अधिपत्याखाली आहे. धुळ्याच्या साक्री नगर परिषदेतदेखील पाच नगरसेवक निवडून आले आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचे हे संघटन वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात शिवसेना काही अंशी मागे गेली आहे. काही वर्षांपूर्वी या महानगरपालिकेत १५ ते २० नगरसेवक असायचे. मात्र, भारतीय जनता पक्षाने पैशांच्या जोरावर व फोडाफोडीचे राजकारण करून नगरपालिकेत सत्ता काबीज केली असल्याचा आरोप त्यांनी केला. जळगावमध्ये अडीच वर्षांत काम कोण करू शकते, हे मतदारांच्याही लक्षात आले आहे. धुळेकरांनाही येणाऱ्या काळात असाच अनुभव येणार असून, महानगरपालिका निवडणुकीत या महानगरपालिकेत शिवसेनेचे वैभव राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button