Dhule Municipal Corporation Pudhari
धुळे

Dhule Municipal Corporation: धुळ्यात भाजपचा झेंडा; अर्ज छाननीतच दोन महिला उमेदवार बिनविरोध होण्याचे संकेत

प्रभाग १ आणि ६ मध्ये एकमेव अर्ज शिल्लक; भाजपसाठी शुभसंकेत, कार्यकर्त्यांचा जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

धुळे : येथील महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग १ `अ’मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला रणजित भोसले व प्रभाग ६ `ब’मधील ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेवेळीच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध निवड स्पष्ट झाली आहे. दोन्ही महिला उमेदवारांचा बिनविरोध विजय भाजपसाठी शुभसंकेत असून, ही तर सुरवात आहे. येत्या दोन दिवसांत भाजपच्या आणखी आठ ते दहा जागा बिनविरोध होण्याची अपेक्षा आहे, असा विश्वास आमदार अनुप अग्रवाल यांनी आज व्यक्त केला.

भाजपच्या प्रभाग एकमधील उमेदवार उज्ज्वला भोसले व प्रभाग सहामधील उमेदवार ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज रणजित भोसले व त्यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले तसेच प्रफुल्ल पाटील व त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात त्यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी नगरसेविका भारती माळी, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुनील कपील, पवन जाजू, देवपूरचे मंडळाध्यक्ष प्रथमेश गांधी, विजय वाघ, भाजप कामगार आघाडीचे विजय पवार आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

यावेळी आमदार अग्रवाल व अंपळकर यांनी विजयी उमेदवार उज्ज्वला भोसले व रणजित भोसले तसेच ज्योत्स्ना पाटील व प्रफुल्ल पाटील यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार जल्लोष करत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. तसेच घोषणाबाजी करत कार्यालय परिसर दणाणून सोडला.

ही तर फक्त सुरवात - आमदार अग्रवाल

आमदार अग्रवाल म्हणाले, धुळे महापालिकेच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेवेळीच भाजपच्या प्रभाग एकच्या उमेदवार उज्ज्वला भोसले व प्रभाग सहाच्या उमेदवार ज्योत्स्ना पाटील या बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. अर्ज माघारीसाठी अजून दोन दिवस आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष असलेल्या रणजित भोसले व शिवसेनेचे (उबाठा) महानगर उपप्रमुख प्रफुल्ल पाटील यांच्यासारखे जनतेत राहून काम करणारे सच्चे आणि प्रामाणिक कार्यकर्ते आम्हाला मिळाले.

त्यांचा आठ दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश झाला. आज उज्ज्वला भोसले व ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड होणे हा शुभसंकेत आहे. यासाठी भोसले व पाटील दाम्पत्याचे खूप-खूप अभिनंदन करतो. शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे. या विकासाचे दरवाजे महापालिकेच्या माध्यमातून खुलतात. त्या महापालिकेच्या निवडणुकीत छाननीच्या दिवशीच आमचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहर विकासासाठी तेही भाजपसोबत येतील.

माघारीअंती भाजपचे आणखी आठ ते दहा उमेदवार बिनविरोध विजयी होतील, अशी अपेक्षा आहे. कारण शहराच्या विकासासाठी भाजपच सक्षम आहे, याची विरोधातील उमेदवारांनाही खात्री आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासीय भाजपच्या पाठीशी आहेत. आमच्या पक्षात कोणीच नाराज नाही. जे आमच्या पक्षात दाखल झाले होते. त्यांना गेल्या निवडणुकीत उमेदवारी देऊन नगरसेवकही बनविले होते. मात्र, त्यांचे काम व्यवस्थित नसल्याने त्यांना आता वगळण्यात आले. तेच आता अन्य पक्षात गेले आहेत. पक्षाच्या विचारांशी बांधिलकी असलेले कार्यकर्ते आजही भाजपमध्येच आहेत. त्यांची असलेली नाराजी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही करू. असे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.

यावेळी प्रभाग एक मधून बिनविरोध निवडीचे संकेत मिळालेल्या सौ. उज्ज्वला रणजित भोसले म्हणाल्या की,धुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत आज माझी अर्ज छाननीवेळीच बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी ही संधी दिल्यानेच आजचा विजय सुकर झाला आहे.असे त्यांनी सांगितले.

तर प्रभाग सहा मधील ज्योत्स्ना पाटील म्हणाल्या की,आज छाननीच्या दिवशीच माझ्या विरोधातील अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने माझी बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, माझ्या प्रभागातील भाजपचे अन्य तीन उमेदवारही जोपर्यंत विजयी होत नाहीत तोपर्यंत माझा विजय अपूर्ण आहे. ते विजयी झाल्यानंतरच आम्ही खरा जल्लोष करू. असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT