

धुळे : धुळे महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला सर्व 74 जागांवर उमेदवार देणे शक्य झालेले नाही. या निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडली असली तरीही स्वतंत्रपणे चूल मांडणाऱ्या शिंदे यांची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी या दोघांना एकत्र आल्यानंतर देखील सर्व जागांवर उमेदवार देता आले नाही.
तर महाविकास आघाडी देखील याला अपवाद राहिलेली नाही. विशेषता भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक 63 जागांवर उमेदवार दिले असून 30 पेक्षा जास्त मावळत्या नगरसेवकांना धक्का देऊन उमेदवारी नाकारली आहे. तर आयारामांना पायघड्या अंथरल्याचे चित्र धुळ्यात देखील दिसून आले.
धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागांमधील 74 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. धुळ्यातील 19 प्रभागांपैकी चार प्रभागांमधील 15 जागांवर संपूर्णपणे अल्पसंख्यांक मतदारांचे प्राबल्य आहे. तर आणखी चार ठिकाणी याच मतदारांचे निर्णायक संख्या आहे. त्यामुळे या प्रभागांमधून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षांना मतदान होण्याची शक्यता कमी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होते आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी नेमकी काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते.
पण उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत महायुती होईल की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. अखेर या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिंदेंची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी यांची युती होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुरू केला. त्यामुळे दोघांनाही सर्व जागांवर उमेदवार देणे शक्य झाले नाही. भारतीय जनता पार्टीने 63 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत यात 31 ठिकाणी पुरुष तर 32 महिला उमेदवारांना संधी दिली. यात माजी महापौर जयश्री अहिरराव ,माजी महापौर प्रतिभा चौधरी , माजी महापौर कल्पना महाले या तिघा महिलांना संधी मिळाली आहे. तर अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे .विशेषता माजी महापौर चंद्रकांत सोनार ,माजी सभापती बालीबेन मंडोरे ,माजी नगरसेविका भारती माळी, प्रशांत बागुल ,माणिकराव जाधव, हर्ष रेलन ,कशीश ऊदासी अशा 33 दिग्गजांना धक्का देण्यात आला आहे .
दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने आयारामांना संधी देऊन पक्षातील निष्ठावानांचा रोष धुळ्यात देखील ओढवून घेतला आहे. विशेषता उमेदवारी दाखल करण्याच्या एक दिवस आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या रणजीत भोसले यांची पत्नी उज्वला भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून भारतीय जनता पार्टीत आलेल्या जोत्स्ना पाटील ,राष्ट्रवादी मधून आलेल्या जितेंद्र शिरसाठ यांची मुलगी पूनम शिरसाट, राष्ट्रवादी मधून आलेल्या कमलेश देवरे, बसपा मधील योगेश ईशी,राष्ट्रवादीच्या माजी महापौर कल्पना महाले, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनायक शिंदे , उद्धव ठाकरे शिवसेनेचे ललित माळी, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. तर काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आश्वासन मिळाल्यानंतर जोरदारपणे प्रभागात काम करणाऱ्या इच्छुकांना देखील उमेदवारी नाकारल्याने रोष व्यक्त झाला आहे यातील अनेकांनी अपक्ष तर इतर पर्याय शोधून उमेदवारी केली आहे.
महायुती न झाल्याने शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र येण्यासाठी शेवटच्या दिवशी हालचाली केल्या. मात्र त्यांना देखील सर्व जागांवर उमेदवार देता आले नाही. शिवसेनेने 33 तर राष्ट्रवादीने 29 ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. या दोघांनाही सर्व 74 जागांचे नियोजन करता आले नाही. विशेषतः महाविकास आघाडीमध्ये देखील यापेक्षा वेगळे चित्र नाही. काँग्रेसने 11 प्रभागांमध्ये 24 ,शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 22 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 12 प्रभागांमध्ये 33 उमेदवार दिले आहेत. यातून महाविकास आघाडीमध्ये देखील एक वाक्यता नसल्याचे दिसून येते आहे. एम आय एम ने चार प्रभागांमधून 14 इच्छुकांना रिंगणात उतरवले आहे. हा संपूर्ण भाग अल्पसंख्यांक मतदारांचे प्राबल्य असलेल्या आहे.