

धुळे : कापूस खरेदी प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. आज त्यांनी अचानक दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग अँड प्रोसेसिंग या भारतीय कापूस निगमच्या खरेदी केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या वेळी मंत्री रावल यांनी कापूस नोंदणी, स्लॉट बुकिंग व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांची संवाद साधून खरेदी प्रक्रियेत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.याबाबत अधिकाऱ्यांची दूरध्वनीवरून झळाझडती घेतली व शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी तात्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांचा हमीभाव योजनेत कापूस विक्रीचा कल पाहता आवश्यक त्या ठिकाणी जिनिंगच्या खरेदी क्षमतेत वाढ करण्याच्या सूचना यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.
दोंडाईचा येथील कापूस खरेदी केंद्रावर मंत्री रावल यांनी भेट देताच, शेतकऱ्यांनी स्लॉट बुकिंग मध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्याने सांगितले.त्यावेळी त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून शेतकऱ्यांना स्लॉट बुकिंग करताना तसेच कापूस विक्री करताना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण येणार नाही या साठी आवश्यकते नियोजन करावे. कापूस करती प्रक्रिया जलद गतीने करावी तसेच खरेदी केंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यात यावी असे निर्देश दिले.
नोंदणी, स्लॉट बुकिंग, व कापूस खरेदी प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या स्पष्ट सूचना मंत्री रावल यांनी केल्या. ज्या जिनिंगची खरेदी क्षमता कमी आहे, त्या जिनिंगची क्षमता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस शासनाच्या किमान हमीभाव योजनेत वेळेत विकला गेला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस विक्री करताना कुठली अडचण येणार यासाठी यंत्रणेने आवश्यक ती काळजी घेऊन नियोजन करावे. तसेच कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद करण्यात यावी असे निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिले.