

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील भाडणे येथील पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत कामगार संघटनेने विरोध दर्शविला आहे.
कारखान्याच्या सुमारे 187 एकर गायरान जमिनीचा व्यवहार खरेदीदाराकडून पूर्ण पैसे न भरताच जमीन त्यांच्या नावावर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पांझरा कान बचाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष व कामगार नेते अशोक भामरे यांनी केला आहे. जमीन बळकावून स्पायका एनर्जी कंपनीच्या नावावर झाल्यावर त्याच जमिनीवर कर्ज घेऊन मग उर्वरित पैसे भरायचे असा संबंधित उद्योगपतीचा डाव असल्याची शंका ही त्यांनी पत्रकात वक्त केली आहे.
या संदर्भात तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन तालुक्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. बैठकीसंदर्भात पूर्णतः गुप्तता पाळली गेली असली तरी 22 डिसेंबर रोजी ही बैठक झाल्याची माहिती गोपनीय व विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.अशा कोणत्याही बैठकीतून जमीन हस्तांतरण करण्याचा निर्णय झाला तरी तो आम्ही मान्य करणार नसल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले.गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही त्यांनी पत्रकातून दिला आहे.लवकरच सर्वपक्षीय संघटनांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान,या प्रकरणी उच्च न्यायालयात केस दाखल असून गायरान जमीन ही शासन मालकीची असल्याने ती खासगी नावावर करता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अशी विक्री बेकायदेशीर ठरते. उर्वरित रक्कम न भरता गायरान जमीन हस्तांतरण म्हणजे सार्वजनिक जमिनीची लूट असल्याचा आरोप करत या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक जमिनीची लूट थांबवावी,अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पांझरा कान बचाव संघर्ष समितीने दिला आहे.