धुळे

Dhule crime : शिरपुर तालुक्यात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई; ७ लाख ५३ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

वाहनाची झडती घेतली असता महाराष्ट्रात विक्री व साठवणुकीस प्रतिबंध असलेला पान मसाला गुटखा आणि तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.

पुढारी वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यातील शिरपुर तालुक्याततब्बल ७ लाख ५३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. वेगॉनर कारमधुन तस्करी करणाऱ्या तिघांवर अन्न व औषध विभागाने धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगवीकडून शिरपुरकडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या वेगॉनर कार क्रमांक MP ०९ ZB ३९२० मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे हडाखेड चेक पोस्ट इथे सापळा रचून संबंधित वाहन अडवण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता महाराष्ट्रात विक्री व साठवणुकीस प्रतिबंध असलेला पान मसाला गुटखा आणि तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.

पुढील कारवाईसाठी वाहन शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी इथे आणण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनातून एकूण ६३४० पॅकेट जप्त करण्यात आले. या प्रतिबंधित मालाची किंमत ७ लाख ५३ हजार ४०० रुपये इतके असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी अतुल ब्राह्मणे वाहनचालक सौरभ ललवाणी क्लिनर आणि हेमंत मराठे मालाचा मालक या तिघांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी इथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त गो.वी.माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसान यांच्या पथकाने यशस्वी रीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT