

पाली : शरद निकुंभ
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावर काल घडलेल्या साखळी अपघाताने या मार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे बोगदे आणि भव्य केबल-स्टेड पूल यामुळे चर्चेत असलेल्या या मार्गावर वाहनचालकांकडून होत असलेली बेदरकार वाहनचालना भविष्यात मोठ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकते, अशी भीती वाहनचालक आणि वाहतूक तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील केबल-स्टेड पुलावर हा अपघात घडला. फॉर्च्युनर कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या व्हेर्ना कारला वाहन थांबविण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही आणि तिने फॉर्च्युनरला धडक दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या एक्सयूव्ही वाहनालाही वेळेत ब्रेक लावता न आल्याने तीही पुढील वाहनांवर आदळली. काही क्षणांतच तीन वाहनांची साखळी टक्कर झाली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र वाहनांमधील एअरबॅग्ज वेळेत उघडल्याने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. अन्यथा ही घटना गंभीर दुर्घटनेत रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता आली नसती.
घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, बचाव पथक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आणि काही वेळात वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र या घटनेने मिसिंग लिंकवरील सुरक्षाविषयक प्रश्न पुन्हा चर्चेत आणले आहेत.
वाहतूक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, हा अपघात केवळ तीन वाहनांच्या धडकेपुरता मर्यादित नाही. अचानक ब्रेक लावणे, वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न राखणे आणि वाहनांच्या वेगातील तफावत या बाबी या घटनेत प्रकर्षाने समोर आल्या आहेत. याच प्रकारे निष्काळजीपणा सुरू राहिल्यास भविष्यात अधिक गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिसिंग लिंक मार्ग सुरू झाल्यापासून अनेक वाहनचालक हा मार्ग वेगवान प्रवासासाठी वापरत असल्याचे दिसून येत आहे. काही कारचालक वेगमर्यादेकडे दुर्लक्ष करून सतत लेन बदलत, वाहनांना कट मारत आणि धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांनाही धोका निर्माण होत आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाताना मार्गाला चढ असल्याने बहुतांश वाहने ८० किमी प्रतितास वेगमर्यादेचे पालन करतात. मात्र पुण्याहून मुंबईकडे येताना उतार असल्यामुळे वाहनांचा वेग सहज वाढतो. अशा परिस्थितीत काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत इतर वाहनांना वारंवार ओव्हरटेक करताना दिसतात.
अनेकदा मागून वेगाने येणारी वाहने पुढील वाहनांवर दबाव निर्माण करतात. सुरक्षित अंतर न राखता वाहन चालविणे, वारंवार लेन बदलणे आणि वेगात वाहन घुसविणे असे प्रकार सातत्याने दिसून येत आहेत.
मिसिंग लिंक प्रकल्पातील सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा हा या मार्गाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अशा बंदिस्त जागेत भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांपैकी एखाद्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्यास किंवा नियंत्रण गमावल्यास काही सेकंदांत मोठा साखळी अपघात घडू शकतो.
वर्तनावर नियंत्रण कुठे?
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर स्पीड गन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ई-चलान यंत्रणा कार्यरत आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई होत असली तरी धोकादायक वाहनचालना, सुरक्षित अंतर न राखणे, वाहनांना कट मारणे आणि नियमबाह्य ओव्हरटेकिंग यावर प्रभावी नियंत्रण दिसून येत नसल्याची तक्रार वाहनचालकांकडून होत आहे. वाहनचालकांच्या मते, केवळ वेगावर लक्ष ठेवून चालणार नाही. वाहनचालकांच्या वर्तनावरही डिजिटल निरीक्षण ठेवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
तातडीने उपाययोजना आवश्यक
मिसिंग लिंक हा महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या मार्गामुळे वेळ आणि इंधनाची बचत होत असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. अतिरिक्त महामार्ग पोलीस गस्त, बोगद्यांमध्ये विशेष निरीक्षण, वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, सुरक्षित अंतर राखण्याबाबत जनजागृती आणि धोकादायक वाहनचालनेवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
२०४ वाहनांवर कारवाई
मिसिंग लिंक मार्ग सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात महामार्ग पोलिसांनी २०४ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रामुख्याने बोगदे, पूल आणि केबल-स्टेड ब्रिज परिसरात वाहने थांबवून सेल्फी, व्हिडिओ आणि रिल्स बनविणाऱ्या वाहनचालकांवर करण्यात आली. मात्र वाहनचालकांकडून उपस्थित केला जाणारा प्रश्न वेगळाच आहे. भरधाव वेगाने वाहन चालविणे, धोकादायक ओव्हरटेकिंग, सुरक्षित अंतर न राखणे, वारंवार लेन बदलणे आणि इतर वाहनांना कट मारणे यासारख्या गंभीर नियमभंगांवर नेमकी किती कारवाई झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.