

किनवट : तेलंगणा राज्याच्या नोंदणी व परवान्याच्या आधारे किनवट शहर व तालुक्यात नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ पिवळ्या ऑटोरिक्षांवर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत कारवाई केली. गुरुवारी (दि. ९) पाच ऑटोरिक्षांवर कारवाई करून ५३ हजार ५०० रुपये, तर शुक्रवारी (दि. १०) सात ऑटोरिक्षांवर कारवाई करून ७५ हजार रुपये, असा एकूण एक लाख २८ हजार ५०० रुपयांचा दंड मोटार वाहन कायद्यातील कलम 66/192 अन्वये आकारण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी दिली.
किनवट शहरात परराज्यातील परवानाधारक काही ऑटोरिक्षांकडून नियमबाह्य प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वाहतूक शाखेने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत सलग दोन दिवस कारवाई करून एकूण १२ ऑटोरिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी सांगितले की, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून परवान्याच्या अटींचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित वाहनांच्या परवान्यांबाबत सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्तावही पाठविण्यात येतील.
मोटार वाहन कायद्यातील नियमांचे पालन करूनच प्रवासी वाहतूक करावी, असे आवाहन पोलिसांनी वाहनचालकांना केले आहे. तसेच आवश्यक परवाने व कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या वाहनांमध्ये प्रवास करताना नागरिकांनीही दक्षता बाळगावी, असेही पोलिसांनी नमूद केले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी स्पष्ट केले.