उत्तर महाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक पुढील आठवड्यात नाशिक दौर्‍यावर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक पुढील आठवड्यात नाशिक दौर्‍यावर येत असून, प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मार्चअखेरमुळे काही दिवस करवसुलीच्या कामगिरीवर असलेल्या सर्व विभागांना तसेच विभागीय अधिकार्‍यांना स्वच्छ सर्वेक्षणाच्या द़ृष्टीने कामाला लागण्याची सूचना करण्यात आली आहे. मागील वर्षी सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक घसरला होता. त्यामुळे यंदा ही कसर भरून काढण्यासाठी मनपाने कंबर कसली आहे.

गेल्या सात वर्षांपासून देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दरवर्षी जानेवारी महिन्यात स्वच्छ शहर स्पर्धेचे आयोजन केले जाते. केंद्र सरकारने नेमलेल्या पथकांमार्फत शहरांचे स्वच्छ सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर संबंधित शहरांची यादी मार्च महिन्यात जाहीर केली जाते. कोरोना महामारीमुळे यंदाचे सर्वेक्षण लांबले.

परंतु, आता पुढील आठवड्यात केंद्रीय पथक नाशिक दौर्‍यावर येणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2019 मध्ये देशभरातील 500 शहरांमध्ये नाशिक शहराचा 67 वा क्रमांक आला होता. नाशिक शहराचा देशातील पहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये समावेश होण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्याचेच फलित म्हणून 2020 मध्ये नाशिकने 67 व्या क्रमांकावरून थेट 11 व्या क्रमांकावर झेप घेतली. 2021 मध्ये मात्र मनपाची क्रमवारी 17 व्या स्थानी घसरली. 2022 च्या सर्वेक्षणात नाशिक देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये यावे यासाठी सर्व यंत्रणांना कामाला लावले आहे. त्या अनुषंगाने आयुक्त रमेश पवार यांनी सोमवारी स्वच्छ सर्वेक्षणाच्या तयारीचा आढावा घेत अधिकार्‍यांना सूचना केल्या.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT