नाशिक : बागेत आगीने पेट घेतला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं…

नाशिक : बागेत आगीने पेट घेतला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं…
Published on
Updated on

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे शिवारात निमोण रस्त्यालगत एका शेतकर्‍याची 2100 झाडांची सात एकरची डाळिंबबाग आगीत भस्मसात झाली. वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. त्यामुळे शेतकर्‍याचे 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले आहे.

नांदूरशिंगोटे येथील निमोण रस्त्यालगत गट नंबर 257 मध्ये संध्या अमरनाथ चकोर यांच्या मालकीची सात एकरवर 2100 झाडे असलेली डाळिंबबाग आहे. या बागेत ठिबक सिंचन केलेले होते. चकोर यांच्या शेतामधून महावितरणच्या तारा गेलेल्या असून, या तारांमध्ये जे अंतर पाहिजे ते नसल्याने थोडासा जरी वारा आला, तरी तारांचे घर्षण होते.

शुक्रवारी वारा असल्यामुळे तारांचे घर्षण झाल्याने संपूर्ण डाळिंबबागेत आगीने क्षणार्धात पेट घेतला. मात्र, वारा जास्त असल्याने संपूर्ण डाळिंबबाग जळून खाक झाली. बागेमधील ठिबक सिंचन, पाण्यासाठी टाकलेले पाइप, बांबू, तारा व बारे सर्व जळून खाक झाले. बागेतील शेतकरी जागेवर नसल्याने मोठे नुकसान झाले. परिसरातील शेतकर्‍यांनी मदत करून होईल तेवढी डाळिंबबाग विझविण्याचा प्रयत्न केला. सिन्नर येथील अग्निशमन दलाला आग विझविण्यासाठी बोलावण्याचा प्रयत्न केला असता, दूरध्वनी उचलला नसल्यामुळे सिन्नर अग्निशमन मदत करू शकले नाही.

ही बाग क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन गेली. त्यामुळे महावितरणकडून त्वरित या ठिकाणी पंचनामा करून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करून भरपाई देण्याची मागणी चकोर यांच्यासह शेतकरीवर्गाने केली आहे.

शेतातील तारा काढून घेण्याची मागणी…
शेतकर्‍यांच्या शेतातून जाणार्‍या तारा महावितरणने त्वरित बाजूने घ्याव्यात. अथवा या तारांमध्ये असलेल्या अंतराचा विचार करून त्याला काहीतरी सपोर्ट टाकून शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता महावितरणने घेणे महत्त्वाचे आहे. मात्र, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सर्वच शेतकर्‍यांच्या शेतामध्ये अशा पद्धतीने तारा पडत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

महावितरणच्या गलथानपणाचा मोठा फटका या शेतकर्‍याला बसलेला आहे. आसपासच्या शेतकर्‍यांनाही यामुळे धास्ती निर्माण झाली आहे. तेव्हा महावितरणने त्वरित आपली माणसे पाठवून या ठिकाणांच्या सर्वच तारा दुरुस्त कराव्यात व शेतकरी वर्गावर पुनश्च अशी परिस्थिती ओढवणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी आहेत कुठं? | स्मृतिदिन विशेष | इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news