Yeli Theft Cases Protest Pudhari
अहिल्यानगर

Yeli Theft Cases Protest: चोरट्यांचा धुमाकूळ; ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको!

वर्षभरात घरफोड्या, शेळ्या-मेंढ्या, केबल चोरीच्या घटना; पोलिसांच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप, १५ दिवसांचा अल्टिमेटम

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: येळी, बडेवाडी, बोंदरवाडी, पिंपळगव्हाण व परिसरात गेल्या वर्षभरापासून चोरीच्या घटनांचे सत्र सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ३) सकाळी येळी फाट्यावर पाथर्डी-खरवंडी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान अनेक ग्रामस्थांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत संतापजनक भावना व्यक्त केल्या.

आंदोलनामुळे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येळी व पंचक्रोशीतील गावांमध्ये गेल्या वर्षभरात घरफोड्या, शेळ्या-मेंढ्यांची चोरी, वीजपंप, केबल, तसेच सौरऊर्जा पंपांच्या केबल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. येळी येथील रेणुका माता मंदिरातील पितळी समया, घंटा, इतर साहित्य, तसेच दानपेटीतील रक्कमही चोरट्यांनी लंपास केली आहे.

२२ व २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अंकुश ढोले यांच्या वस्तीवरील शेळ्यांची चोरी झाली. यापूर्वी येळी फाट्यावरील दुकाने दोन वेळा फोडण्यात आली असून, दादासाहेब बाजीराव कराड यांच्या हॉटेलमध्येही चोरीची घटना घडली आहे.या घटनांबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही तपासाला गती मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. काही चोरीच्या घटनांमधील संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरही पुढील ठोस कार्यवाही झाली नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

परिसरात सातत्याने चोऱ्या होत असल्याने शेतकरी, वस्तीवर राहणारे नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांना अवघड झाले आहे. आंदोलनावेळी पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यापुढे चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी चोरट्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी सरपंच संजय बडे यांनी, गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीच्या घटना घडत असून ग्रामस्थांना न्याय मिळत नाही. येत्या पंधरा दिवसांत चोरीच्या घटनांचा तपास लावून आरोपींना अटक करावी; अन्यथा पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच येळी परिसरातील बीटच्या पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. या आंदोलनात सरपंच संजय बडे, सतीश गर्जे, जनार्दन जायभाये, महादेव जायभाये, अमोल कराड, नितीन गोल्हार, देविदास कराड, द्वारकानाथ ढोले, राजू पालवे, विनोद बडे, राजू कराड, भागवत ढोले यांच्यासह येळी व पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT