श्रीरामपूर: तालुक्यातील उक्कलगाव येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे पोल्ट्री फार्ममधील 200 कोंबड्या छताखाली दबनू मृत्युमुखी पडल्या तर एका शेतकऱ्याच्या घरातील पत्रे उडून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.
जरी पावसाचे प्रमाण कमी असले तरी, मात्र वादळी वाऱ्याने रब्बी हंगामातील गहू, मका, द्राक्ष, हरभरा, कांदा, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळामुळे पटेलवाडी-शिवररत्यावर दीपक सोपान मोरे यांच्या पोल्ट्री फॉर्मचे छत उडून पडले. त्यात 200 कोंबड्या छताखाली दबून मुत्युमुखी पडल्या. याच शिवारातील बन्सी नारायण पारखे यांच्या घराचे पत्रे उडाले असून, त्यांचे सोलर पंपाचे पॅनलही तुटले. शेतकरी सिंधूबाई रमेश मकासरे, भाऊसाहेब फुलपगार, राहुल दत्तात्रय लोखंडे, यांच्याही सोलर पंप पॅनलचे नुकसान झाले. शेतकरी हरीभाऊ फुलपगार यांचे घराचे पत्रे उडून गेल्याने भिंती कोसळल्या. संसार उघड्यावर आला. धनवाट ररत्यावर बाबासाहेब गोपीनाथ जगधने व गोपीचंद गोमाजी रजपूत यांच्या घरावरील पत्रे उडून गेले.
या रस्त्यावर वादळाने झाडे कोसळली असून, वीजपुरवठाही रात्री उशिरापर्यंत सुरळित झाला नव्हता. शेतकरी संजय बाबूराव जगधने, प्रकाश नानासाहेब थोरात, प्रशांत शिवाजी जगधने यांच्या द्राक्षबागेतील खांब कोसळल्याने नुकसान झाले. खंडाळा ररत्यावरील तीनशे नाला परिसरात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला. प्रशासनाने शेती व नुकसान झालेल्या पडझडीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी केली.
शेवगाव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान
शेवगाव तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, उन्हाळी बाजरी, भाजीपाला, कांदा तसेच टरबूज, खरबूज आणि आंबा या पिकांना या पावसाचा जबर फटका बसला असून शेतकरी संकटात सापडला आहे.
बोधेगाव, बालमटाकळी, दिवटे, गोळेगाव, चापडगाव, सोनविहिर, शहर टाकळी या परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारा आणि गारपीट झाली. काही ठिकाणी पावसाचा जोर इतका होता की शेतात उभे असलेले गहू आणि हरभऱ्याचे पीक अक्षरशः आडवे झाले. काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
गारपिटीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून टोमॅटो, वांगी, मिरची यांसारखी पिके पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. कांद्याच्या शेतात पाणी साचल्याने सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच टरबूज आणि खरबूज या फळपिकांवर गारांचा मार बसल्याने फळे फुटून नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या बागांमध्ये मोहोर व लहान फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली. दरम्यान, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाने त्वरित पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.