नगर तालुका : अहिल्यानगर शहराजवळील तपोवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला बिबट्या अखेर शुक्रवारी (दि. 28) पहाटे पिंजऱ्यात अडकला. या घटनेमुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
शहरालगतच्या तपोवन परिसरातील कराळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना, सोमवारी (24 नोव्हेंबर) दुपारी बिबट्याचे तीन बछडे आढळले होते. त्यानंतर तात्पुरती ऊसतोड थांबवण्यात आली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल अविनाश तेलोरे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिंजरा लावून ड्रोनद्वारे परिसराची टेहळणी केली.
दरम्यान, बिबट्याचे बछडेे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाने बछड्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बछड्यांकडे त्यांची आई गुरगुरत धावून येत होती. चार दिवसांनंतर, 28 नोव्हेंबर रोजी ती पिंजऱ्यात अडकली. ही मादी त्याच बछड्यांची आई असावी, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. तपोवन रस्त्यावर बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सदर ठिकाणी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नगर शहराजवळील तपोवन रोडवरील कराळे मळ्यात बिबट्याचे तीन बछडे आढळून आले असतानाच, बोल्हेगाव परिसरात एका बिबट्याने मेंढपाळाच्या कळपावर हल्ला करून एक मेंढी ठार केली आणि एक बोकड फरफटत नेल्याचे समोर आले. बंडू किसन तांबे (रा. ढवळपुरी, ता. पारनेर) हा मेंढपाळ आपला कळप घेऊन संपत विठ्ठल वाकळे यांच्या शेतात आला होता. पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढीचा मृत्यू झाला. एक बोकड बिबट्याने फरफटत नेला. ही घटना मेंढपाळाच्या डोळ्यासमोर घडल्याचे सांगण्यात येते.
वनपाल नितीन गायकवाड, वनरक्षक विजय चेमटे यांनी पंचनामा केला. त्यांनी हे हल्ले बिबट्याने केल्याची खात्री केली असून, नागरिकांना काळजी घेण्याची सूचना केली आहे. शहर परिसरात गेल्या 3-4 दिवसांत बिबट्याच्या वावराची ही दुसरी घटना असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात मागील तीन वर्षांत 19 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 136 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात चालू वर्ष 2025 मध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात या वर्षात बिबट्याने आठ जणांचा बळी घेतला आहे, तर विदर्भात चालू वर्षात एकाचा बळी घेतला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नरसह काही वनपरिक्षेत्रात ही बिबट्यांची संख्या वाढलेली असून बिबट्याकडून ग्रामस्थांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत आहेत.