अमोल बी. गव्हाणे
श्रीगोंदा: पाच महिने अखंड कष्ट, घरट्याचे विणकाम आणि पिलांचा सांभाळ केल्यानंतर आता निसर्गाचा कुशल अभियंता असलेल्या सुगरण पक्ष्याच्या जीवनात जबाबदारीतून सुटका आणि मुक्त भटकंतीचा काळ सुरू झाला आहे. तांदळी दुमाला, बेलवंडी परिसरातील तलाव आणि बाभळीच्या झाडांवर लटकणारी १५ ते २० टुमदार घरटी आता रिकामी झाली असून वाऱ्यावर हळुवार लोंबकळत आहेत. मे महिन्यापासून सुरू झालेली या पक्ष्यांची धावपळ आता थांबली असून शिवारात मुक्त संचार सुरू झाला आहे.
एप्रिल ते सप्टेंबर हा काळ सुगरणसाठी अत्यंत कष्टाचा असतो. या काळात नर पक्ष्याला मादीला आकर्षित करण्यासाठी एक घरटे विणण्यासाठी ५०० ते १००० वेळा शेतातून बारीक गवताच्या काड्या आणाव्या लागतात. घरटे दोन मजली असते, वरच्या मजल्यावर नर आणि खालच्या सुरक्षित खोलीत मादी राहते. त्याचे तोंड मुद्दाम खाली आणि लांब नळीसारखे बनवले जाते, जेणेकरून साप, घुबड यांसारख्या शत्रूंपासून पिलांचे रक्षण होते.
अर्धवट घरटे झाल्यावर मादी त्याची पाहणी करते. विणकाम सैल असेल, पाणी गळत असेल तर ती ते नाकारते. तेव्हा नराला पुन्हा नव्याने घरटे विणावे लागते. म्हणजेच निसर्गातही 'क्वालिटी कंट्रोल' मादीच्या हातात असते. पसंतीनंतरच अंडी उबवणे, पिलांना भरवणे आणि ऊन-पावसापासून रक्षण करणे या सर्व जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडतात.
आता ऑक्टोबर महिन्यात पिल्ले मोठी होऊन स्वतःच्या पंखावर उडण्यास शिकली आहेत. त्यांना स्वतःचा चारा शोधता येऊ लागला आहे. त्यामुळे आई-वडिलांची पाच महिन्यांची मोठी जबाबदारी संपली आहे. जी घरटी कालपर्यंत पिलांच्या चिवचिवाटाने गजबजली होती, ती आज रिकामी झाली आहेत.
जबाबदारी संपल्याने आता पक्ष्यांचे मोठे थवे शेत-शिवारात मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. पावसाळ्यात जो पक्षी घरट्यापासून ५०० मीटरही लांब जात नव्हता, तोच पक्षी आता १० ते १५ किलोमीटरचा फेरफटका मारत मुक्तपणे विहार करत आहे. हा त्यांचा हिवाळ्यापर्यंतचा मुक्त संचाराचा काळ आहे.