

नगर: विजयादशमीच्या (दसरा) पूर्वसंध्येला सोमवारी शस्त्रपूजा साहित्य आणि नवीन कपडे खरेदीसाठी अहिल्यानगर शहर आणि उपनगरांतील बाजारपेठेत गर्दी उसळली होती. नागरिकांच्या गर्दीमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, व्यापारी वर्गात ऐन दुष्काळी परिस्थितीत आनंदाचे वातावरण पसरले आहे. यंदा झेंडू फुलाची आवक कमी दिसत आहे. त्यामुळे झेंडू भाव खाणार असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, सोमवारच्या आठव्या माळेनिमित्त केडगाव, बुर्हानगर आदी ठिकाणी आदिशक्तीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी सणाची घरोघरी लगबग सुरू आहे. विजयादशमी म्हणजे शस्त्रपूजन आणि सीमोल्ंलंघन. त्यामुळे शस्त्रपूजेसाठी आवश्यक साहित्यांची सावेडी उपनगर, कोठी चौक, आणि दिल्ली गेट आणि इतर ठिकाणी फुलांचे स्टॉल्स उभारले गेले.
आपट्याची पाने आणि पूजेसाठी लागणारे इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी सायंकाळच्या वेळी शहरातील चौकाचौकांत ग्राहकांची गर्दी झाली होती. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोमवारी झेंडूची फुले बाजारांत चौकाचौकांत होती. ८० ते १०० किलो दराने फुले विकली जात होती. हाच दर विजयादशमीच्या दिवशी १२० रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाजारपेठेत नवीन कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहरातील कापड बाजार, माळीवाडा, चितळे रोड आणि सर्जेपुरा तसेच सावेडी उपनगरातील कापडांच्या दुकानांत सोमवारी (दि.१९) नागरिकांची झंबड उडाली होती. नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्तीच्या दर्शनासाठी आणि खरेदीसाठी गेले काही दिवस रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.
साडेतीन मुहूर्तावर सोने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीचा पायडा आहे. त्यामुळे शहरातील सर्वच सराफी दुकानांत पारंपरिक आणि नव्या डिझाईनचे दागिने खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी झाली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने खरेदीला विजयादशमी हा मुहूर्त चांगला असल्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून या वाहनांची बुकिंग करण्यासाठी शोरूममध्ये युवकांची गर्दी उसळली आहे. ऐन दसर्याच्या दिवशीच नवीन बाईक खरेदीसाठी गर्दी होणार असल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी शोरूम सजले आहेत. विजयादशीचा शुभमुहूर्त साधून नागरिकांची सोने आणि वाहने खरेदीसाठी लगबग सुरू असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे.
रावण दहन आणि सीमोल्लंघन
विजयादशमीनिमित्त शहरात ठिकठिकाणी पारंपरिक सीमोल्लंघन केले जात आहे. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी रावण दहन आणि शस्त्रपूजा कार्यक्रमांसाठी संस्था आणि संघटनांच्या वतीने पूर्वतयारी सुरू आहे. सावेडीतील श्री तुळजाभवानी माता मंदिरात मंगळवारी (दि.२०) सायंकाळी ७.३० वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत रावणदहन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.