State Sports Competition Maharashtra Pudhari
अहिल्यानगर

State Sports Competition Maharashtra: खेळातूनच घडते सुदृढ मन, सकारात्मक प्रशासन आणि संघभावना : गिरीश महाजन

लोणी-शिर्डीत जलसंपदा विभागाच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना शानदार प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी : खेळ आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे देतो. खेळामुळे आपण पराभव पचवायला व विजयात नम्रता बाळगायला शिकतो. खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते. मनातील अहंकार गळून पडतो. आपल्या प्रशासकीय कामकाजात व वैयक्तिक आयुष्यातही या गुणांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपुरते न खेळता, व्यायामाचा हा मंत्र आयुष्यभर जपा. यातूनच चांगले आरोग्य, सकारात्मक मानसिकता व पर्यायाने एक उत्तम प्रशासन घडेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) गिरीश महाजन यांनी शनिवारी केले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने लोणी - शिर्डी (ता. राहाता) येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2026 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाजन म्हणाले, मी स्वतः शालेय जीवनापासून खेळाशी जोडलेलो आहे. एक खेळाडू म्हणून मला खेळाचे महत्त्व जवळून माहीत आहे. तुम्ही या स्पर्धेकडे नियमित व्यायाम व सराव म्हणून पाहिले पाहिजे. जीवनात शारीरिक तंदुरुस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवसातून किमान अर्धा-पाऊण तास तरी स्वतःसाठी वेळ काढा. धावणे, चालणे किंवा योगासने करा. अनेकदा तणाव आला म्हणून लोक व्यसनाचा आधार घेतात, परंतु तणाव कमी करण्यासाठी व्यसनाची मुळीच गरज नसते. जर तुमची तब्येत चांगली असेल, तर मनस्थिती आपोआपच चांगली राहते. तुमच्या मनगटात ताकद असेल, तर मनात आपोआप धाडस निर्माण होते. हे केवळ नियमित व्यायाम व सुदृढ शरीरामुळेच साध्य होऊ शकते, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

विखे पाटील म्हणाले, सहकाराचा वारसा लाभलेली ही भूमी आता क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करत आहे. ज्याप्रमाणे सहकारातून विकासाची दिशा मिळते, तसेच खेळाच्या माध्यमातून प्रशासनात शिस्त व सांघिक भावना रुजविण्याचे आमचे ध्येय आहे. अहिल्यानगरच्या मातीत सेवाभाव व खेळाडूवृत्तीचा अनोखा संगम साधला गेला असून, स्पर्धेतील जय-पराजयापेक्षा येथून मिळणारी सकारात्मक ऊर्जा व प्रशासकीय मैत्रीबंध अधिक घट्ट करणे, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

अपर मुख्य सचिव कपूर म्हणाले, स्पर्धेत केवळ सहभाग महत्त्वाचा नसून जिंकण्याच्या जिद्दीनेच खेळा. क्रीडांगणात उतरल्यावर विजय मिळवण्याच्या उद्देशानेच खेळले पाहिजे. मंत्रालयातील दैनंदिन कामातून वेळ काढत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सरावाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले. अर्जुन पुरस्कारार्थी भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाठ, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू अक्षय आव्हाड व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी खो-खो खेळाडू श्वेता गवळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सचिव (लाभक्षेत्र विकास) संजय बेलसरे, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील आदी उपस्थित होते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिमनवार यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्ज्वलित करून व शानदार पथसंचलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेचा शुभंकर असलेल्या जलवीर व विजेता चषकाचे अनावरणही करण्यात आले.

मंत्र्यांची फटकेबाजी आणि बुद्धिबळातही कौशल्य

प्रशासकीय कामाच्या व्यापातून वेळ काढत अधिकाऱ्यांनी मैदानात गाजवलेले कसब व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द मंत्र्यांनीच हातात घेतलेली बॅट... अशा अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धांना लोणी बुद्रुक येथे शानदार सुरुवात झाली. विशेष म्हणजे राज्याचे दोन्ही जलसंपदामंत्री महाजन आणि मंत्री विखे पाटील यांनी मैदानात उतरून खेळात सहभाग नोंदवत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध क्रीडांगणांवर स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी क्रिकेटच्या खेळपट्टीवर बॅटिंगचे कौशल्य दाखवले, तसेच बुद्धिबळाच्या पटावरही काही वेळ चाल खेळत बौद्धिक कौशल्याची चुणूक दाखवली. या वेळी मंत्री महाजन आणि मंत्री विखे पाटील यांनी कबड्डीपटू व इतर स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.

सोमवारी समारोप

या स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, ॲथलेटिक्स, कॅरम, जलतरण, टेबल टेनिस, बुद्धिबळ व बॅडमिंटन या खेळांचा समावेश असून, यात 480 महिला व 970 पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. 9 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे या महोत्सवाचा समारोप होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT